लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : उबगी (ता. कळमेश्वर) येथील पाेल्ट्री फार्ममधील २५० काेंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्यू’ने झाला नाही, असा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय कळमेश्वर येथील सहायक आयुक्त डाॅ. जयश्री भूगावकर यांनी दिली. त्यामुळे त्या काेंबड्यांचा मृत्यू डीजेच्या आवाजामुळे घाबरल्याने व गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पाेल्ट्री फार्ममध्ये १२ हजारांच्यावर काेंबड्या आहेत. फार्मजवळ रविवारी (दि. १०) झालेल्या कार्यक्रमात डीजे वाजविण्यात आला. त्यानंतर साेमवारी (दि. ११) सकाळी येथील २५० काेंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्या काेंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्यू’ने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात हाेती. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाेल्ट्री फार्मची पाहणी करत मृत काेंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठविले हाेते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ‘रिपाेर्ट निगेटिव्ह’ असल्याचे अर्थात त्या काेंबड्यांना ‘बर्ड फ्यू’ची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सहायक आयुक्त डाॅ. जयश्री भूगावकर यांनी दिली.
....
अति संवेदनशील पक्षी
काेंबड्या अतिसंवेदनशील पक्षी आहेत. कशाच्याही माेठ्या आवाजाला त्या घाबरतात व भीतीमुळे सैरावैरा पळतात किंवा काेपऱ्यात लपण्याचा प्रयत्न करतात. डीजेच्या आवाजामुळे घाबरलेल्या काेंबड्यांना पळायला जागा न मिळाल्याने या काेपऱ्यात एकमेकांवर चढल्या. त्यामुळे खाली दबल्या गेलेल्या काेंबड्यांना श्वास घेणे शक्य न झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, आवाजामुळे घाबरलेल्या काेंबड्या भीतीमुळे रात्रभर झाेपत नाहीत. झाेप न झाल्याने त्यांना अपचन हाेते आणि त्यात त्यांचा मृत्यू हाेताे, अशी माहिती पाेल्ट्री फार्म संचालकाने दिली.