लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधारलेल्या आयुष्यावर आाम्ही कधीचीच मात केली आहे. ४० वर्षाच्या प्रवासात कधीही इतक्या वेळ रेल्वे थांबली नाही आाणि आम्हीही थांबलो नाही. लॉकडाऊनने रेल्वे तर थांबविली अन् आमचे जगणेही थांबविले. लॉकडाऊनची भीती वाटते साहेब, अशी खंत अंध विष्णू डोंगरे यांनी व्यक्त केली.इंदिरानगर येथे राहणारे विष्णू डोंगरे ४० वर्षांपासून रेल्वेमध्ये प्रवाशांना उपयोगाच्या साहित्याची विक्री करतात. पत्नी आणि दोन मुलांच्या कुटुंबाला विष्णूचा मोठा हातभार होता. पत्नीही थोडीफार काम करायची. किरायाच्या घरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. पहाटे ४ वाजता विष्णू सामानाची भलीमोठी बॅग व हातात काठी घेऊन रेल्वेने बल्लारशापर्यंत प्रवास करायचे. यात ज्या काही साहित्याची विक्री व्हायची, त्यातून त्यांच्या कुटुंबीयाचे पोट भरायचे. पत्नीही लहान मुलांचे खेळाचे साहित्य तयार करून कुटुंबाला हातभार लावायची. पण २२ मार्चपासून सरकारने रेल्वे बंद केली आहे. विष्णू त्या दिवसपासून घरातच बसून आहे. पत्नीचेही काम लॉकडाऊनमुळे बंद पडले आहे. हातातला पैसा संपतो आहे आणि लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा आहे. ही एकट्या विष्णूची कहाणी नाही, विष्णूसारखे अनेक अंध आहेत, जे रेल्वेत साहित्याची विक्री करतात. अनेक अंध आहेत, जे छोटा-मोठा रोजगार करून पोटाची खळगी भरतात. रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठेमध्ये काहीतरी विक्री करणारे हे अंधबांधव लॉकडाऊननंतर बाहेरच पडलेले नाही. रस्त्यावर सुरू असलेले अन्नधान्य वाटप त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. शहरात संचारबंदीमुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. अशात जीव दोन घासासाठी तडफडतो आहे. या अंधांबरोबरच त्यांचे चिल्लेपिल्लेही आहेत. वस्त्यावस्त्यांमध्ये हे लोक मिळतात. फक्त शोधून त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे.