नागपूर : टीसीकडून कारवाई होण्याची भीती वाटल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणाने धावत्या ट्रेनमधून खाली उडी घेतली. मंगळवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया नागपूर रेल्वे मार्गावर ही थरारक घटना घडली. या घटनेत संबंधित तरुण जबर जखमी झाला.
महेश संतोष सोनी (वय २२, रा. रिवा मध्यप्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो मुळचा रिवा येथील रहिवासी असून, त्याचे आईवडील दत्तवाडी भागात रोजगाराच्या निमित्ताने राहतात. महेश रिवा येथे एमएससी करतो आहे. दिवाळीच्या निमित्ताने सोनी कुटुंबीय आपल्या मुळगावाला रिवा येथे गेले होते. महाराष्ट्र एक्सप्रेसने ते मंगळवारी नागपूरला परत येत होते.
आईवडीलांसोबत महेशही नागपूरला येत होता. कन्हान- कामठी दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये तिकिट चेकर (टीसी)ने महेशच्या आईवडिलांकडे तिकिटाची विचारणा केली. तिकिट नसल्याने महेश घाबरला. टीसी दरडावणीची भाषा करत असल्यामुळे तो कारागृहात डांबणार, अशी भीती वाटल्याने महेशने धावत्या ट्रेनमधून खाली उडी घेतली. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
ट्रेनमधून तरुण खाली पडल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी आरडाओरड केली. परंतू कुणीही धोक्याचे संकेत देणारी डब्यातील साखळी ओढण्याचे प्रसंगावधान न दाखवल्याने ट्रेन तशीच पुढे निघून कामठी स्थानकावर गेली. आईवडिलांकडून आरडाओरड झाल्याने रेल्वे सुरक्षा दलाने खाली पडलेल्या तरुणाकडे धाव घेतली आणि त्याला तातडीने उचलून आधी रेल्वे रुग्णालयात आणि नंतर कामठीच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर त्याला नागपूरच्या मेयो ईस्पितळात हलविले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वेग कमी असल्याने धोका टळला
घटनेच्या वेळी कामठी रेल्वे स्थानक जवळ असल्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला होता. त्यामुळे महेशला जबर दुखापत झाली असली तरी त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच ईतवारी रेल्वे ठाण्याचे सहायक निरीक्षक एन. डोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात संबंधितांचे बयाण नोंदविणे सुरू होते. त्यामुळे सायंकाळी ६ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.