लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही रुग्ण आढळल्यानंतर अमेरिका सरकारने १३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. थोडा उशीरच म्हणावा लागेल. आता भारतात जशी परिस्थिती आहे, साधारण चार आठवड्यांपूर्वी अमेरिकेतही हीच परिस्थिती होती. लॉकडाऊन करण्यात आले पण पोलिसांनी रस्त्यावर येऊन सक्ती केली नाही. सुरुवातीला लोकांनी दुर्लक्ष केले पण न्यूयॉर्कमध्ये रुग्णवाढीचा भडका उडाला आणि लोकांच्या मनात धडकी भरली. आताही रस्त्यावर पोलीस नाहीत पण परिस्थितीमुळे लोकांनी स्वत:च घरामध्ये लॉकडाऊन करून घेतले. न्यूयॉर्कपासून अवघ्या २०० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या फिलाडेल्फिया शहरात राहणारे स्वरूप डोंगरे यांनी अमेरिकेत क्षणोक्षणी बदलत्या थरारक परिस्थितीचा अनुभव मांडला.स्वरूप गेल्या दहा-बारा वर्षांपासून अमेरिकेत एका बांधकाम कंपनीत कार्यरत आहेत. शहरातील ज्या माँटगोमरी सोसायटीत ते राहतात त्या सोसायटीत शंभरच्या जवळपास भारतीय कुटुंबे आहेत. यातील बहुतेक कुटुंबे महिनाभरापासून एकमेकांना भेटलेसुद्धा नाहीत. लॉकडाऊन लागण्यापूर्वी व्यवस्था करण्यासाठी नागरिकांना दोन दिवसांचा काळ देण्यात आला. त्या काळात नागरिकांनी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घेतली. मात्र ग्रोसरीची दुकाने आताही सुरू आहेत पण लोकांची फारशी गर्दी होत नाही. ऑनलाईन मागणीलाच प्राधान्य दिले जाते. कुणी बाहेर जाऊन साहित्य आणले तरी घरी आणण्यापूर्वी तीन-चार दिवस गॅरेजमध्येच ठेवण्यात येते. आता रस्त्यावर नागरिकांची फार गर्दीही दिसत नाही. सोबत दोन लोकांच्यावर कुणी फिरत नाही आणि त्यातही अंतर ठेवले जाते. रस्त्यावर पोलीस नाहीत पण लोकांनीच डिस्टन्सिंग स्वीकारली असल्याचे स्वरूप म्हणाला. १६ मार्चपर्यंत अमेरिकेत रुग्णसंख्या कमी होती. पण १८ ला बाधितांचा आकडा वाढला आणि मग वाढतच गेला. न्यूयॉर्क शहर सर्वाधिक गर्दीचे असल्याने ते अधिक प्रभावित आहे. माँटगोमरी जिल्ह्यातही रुग्णसंख्या दीड ते दोन हजार असल्याची माहिती स्वरूप यांनी दिली. आधी शाळा व मग एकेक गोष्ट बंद करण्यात आली. बाहेर निघताना हॅॅण्डग्लोव्हज आणि मास्क बंधनकारक आहे. दुकानही दररोज सॅनिटाईझ केली जातात आणि ग्राहकांसाठी बाहेरच सॅनिटायझेशनची व्यवस्था केली जाते. लोकांमध्ये भीती आहे पण संयमाने परिस्थिती हाताळली जात असल्याचे त्यांनी सांगितले. टेस्टिंगमुळेही रुग्णसंख्या मोठी दिसतेसुरुवातीला दुर्लक्ष झाले, असे म्हणता येईल पण रुग्णसंख्या वाढलेली दिसण्याचे आणखी कारण म्हणजे टेस्टिंग (तपासणी)चा वेग. आधी चाचणी करण्यासाठी दोन दिवस लागायचे. तेच नंतर ५ तासांवर आले पण आता १५ मिनिटांत चाचणी पूर्ण केली जाते. एका दिवसात हजारो चाचण्या केल्या जातात. रुग्णांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. मित्राच्या घरी पोहचविले जीवनाश्यक साहित्यहरियाणाचा एक मित्र आईच्या निधनामुळे भारतात त्याच्या गावी आला. त्याच काळात लॉकडाऊन झाले आणि तो इथेच अडकला. तो इथे आणि पत्नी व मुले तिथे. त्यावेळी मित्रांनी त्यांच्या घरी अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पोहचविले. भारताच्या परिस्थितीचीही चिंताचार आठवड्यांपूर्वीप्रमाणे आजची भारताची परिस्थिती आहे. त्यामुळे अधिक चिंता वाटते. त्यामुळे दररोज भारतातील परिस्थितीचे अपडेट घेत असतो. आपल्या नागपूर शहरातील बातम्याही ऑनलाईन पोहचत असतात. सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समाधान आहे. भारतात धोका टळेपर्यंत हीच परिस्थिती राहो, अशी प्रार्थना असल्याची भावनाही स्वरूप यांनी व्यक्त केली. भीमजयंती घरीच साजरी केलीन्यूयॉर्क शहरात दरवर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य स्वरूपात साजरी होते. अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यातील सर्व भारतीय येथे गोळा होतात; मात्र यावर्षी परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे जयंतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मी स्वत: सहा महिन्यांपासून न्यूयॉर्कला गेलेला नव्हतो व १४ ला जाण्याचे निश्चित होते; पण यावेळी घरीच बाबासाहेबांना अभिवादन केल्याचेही स्वरूप यांनी सांगितले.
न्यूयॉर्कपासून २०० किलोमीटरवर अनुभवतो भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:44 PM
न्यूयॉर्कपासून अवघ्या २०० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या फिलाडेल्फिया शहरात राहणारे स्वरूप डोंगरे यांनी अमेरिकेत क्षणोक्षणी बदलत्या थरारक परिस्थितीचा अनुभव मांडला.
ठळक मुद्देभारतीय कुटुंबाने मांडली परिस्थिती : महिनाभरापासून एकमेकांची भेट नाही