रियाज अहमद
नागपूर : आरटीईत प्रवेश घेणाऱ्या पालकांकडून उपक्रम शुल्कापोटी शाळा वसुली करीत आहे. या संदर्भातील तक्रार शिक्षण उपसंचालकासमोर करण्यात आली. जुलै महिन्यात शिक्षण उपसंचालकांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यांनी तीन सदस्यीय समिती गठित केली होती. समितीने अजूनही या प्रकरणाची चौकशी केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीई अॅक्शन समितीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ यांनी आरटीई पालकांच्या तक्रारीचा शिक्षण उपसंचालकांपुढे ठेवल्या होत्या. पालकांच्या तक्रारीमध्ये ई-पाठशालाद्वारे आरटीईच्या पालकांकडून उपक्रम शुल्काच्या माध्यमातून नऊ हजार रुपये घेण्यात आले. लॅपटॉपसाठीसुद्धा शाळेने पालकांवर जोर दिला होता. परंतु नियमानुसार अशी तरतूद नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप घेणे आवश्यक नाही. नियमानुसार पाचव्या वर्गापर्यंत कुठलेही उपक्रम करता येत नाही. तक्रारीत काही पालकांनी फी न दिल्यामुळे परीक्षेला बसू देणार नाही, असाही शाळेकडून दबाव टाकण्यात आला होता. चौकशी समितीने यासंदर्भात कुठलीही चौकशी केली नाही.
- शिक्षण अधिकाऱ्यांनी नाही उचलला कॉल
या प्रकरणात लोकमतने शिक्षणाधिकारी (प्राथ.) चिंतामण वंजारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.