भिवापूर : भिवापूर तालुक्यातील मेढा आणि झिलबोडी या दोन गावांना जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या पायल्या रेतीमुळे आणि वाहून आलेल्या काटेरी झुडूपांमुळे बुजल्या आहेत. तर पुलावरील भागही उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून लोखंडी सळाकी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे थोडासा पाऊस पडला तरी या दोन गावांचा संपर्क तुटतो. मेढा आणि झिलबोडी या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर नदी आहे. त्यावर पाच ते आठ पायल्यांचा पूल आहे. अधिक काळ उलटल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे.
नदीपात्रातील गाळ व झाडाझुडूपांचा गुंता खोलवर गुंतल्यामुळे पुलाच्या पायल्या बुजल्या आहेत. पाणी वाहून जाण्याकरिता जागाच मिळत नसल्यामुळे नदीपात्रात नेहमी पाणी साचून राहते. अशातच आता पाऊस झाल्याने नदीपात्रातील पाणी पुलावरून फेकल्या जात आहे. त्यामुळे दोन्ही गावांची अंतर्गत वाहतूक वारंवार ठप्प होत आहे. हा पूल जीर्ण झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता सुध्दा बळावली आहे. दोन गावांना जोडणारा हा मार्ग तालुकास्थळी येण्याकरिता इतर गावांना सुध्दा तितकाच महत्वाचा ठरतो. चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूकही याच मार्गाने होते. त्यामुळे या पुलाच्या पायल्यांची तात्काळ सफाई करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
---------------------------------------------
तरुणांनीच घेतला पुढाकार
पुलाच्या जीर्णावस्थेबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्यात. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस गावातील तरुणांनीच पुढाकार घेत श्रमदान केले. नदीपात्र भरले असतानाही पुलाच्या पायल्यात अडकलेली झुडूपे शक्य तेवढी बाहेर काढून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली. येथील धोकादायक लोखंडी सळाकी सुध्दा या तरुणांनी कटरने कापल्या. त्यामुळे तात्पूरता दिलासा मिळाला आहे. मात्र येथेच न थांबता प्रशासनाने पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. श्रमदान करणाऱ्या मंडळीत वैभव लाखे, आशिष ठाकरे, शुभम राऊत, रितिक इरदंडे, महेंद्र घोडमारे, गणेश राऊत, संकेत भोगे, तुषार खोब्रागडे, आदित्य खंडाळ, लोकेश चौधरी, निखिल खोब्रागडे आदींचा सहभाग होता.