लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्मासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, तर अधर्माच्या नाशासाठी शस्त्राचा आधार घेतात. धर्मासाठी कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार करणे म्हणजे एकप्रकारे शास्त्राची पूजा करणे होय, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सायंटिफीक सभागृहात सुप्रसिद्ध गाणपत्य विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांना २०१९ चा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर सुप्रसिद्ध शिवकथाकार, सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुख, सत्कारमूर्ती प्रा. स्वानंद पुंड, आर्य दयानंद कन्या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. वंदना खुशालानी उपस्थित होत्या. डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, समाजातील पूज्य व्यक्तींचा सत्कार व्हायला हवा. परंतु आज अपूज्य व्यक्तींचा सत्कार करणे ही समाजाची व्यवस्था झाली आहे. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिजामातेच्या नावाने पुरस्कार देण्यात येत असल्यामुळे आवर्जून कार्यक्रमाला येण्याचे ठरविले. संस्कार देण्याचा विषय निघाला की जिजामातेचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुख यांनी स्वानंद पुंड यांचे कार्यच मोठी उपासना असल्याचे मत व्यक्त करून त्यांच्यावर सदैव जिजाऊ, श्री गणेशाचा आशीर्वाद राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. सत्कारमूर्ती प्रा. स्वानंद पुंड म्हणाले, जिजामातेच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार स्वर्गाच्या वाटेवरील पासपोर्ट आहे. पुरस्काराच्या नावासाठी आपला विचार व्हावा हाच मोठा पुरस्कार होता. जिजाऊंसारखे अधिष्ठान असले तरच छत्रपती घडू शकतात. हा पुरस्कार आयुष्याचे सार्थक आहे. सज्जनांना योग्य वाटावे असे प्रत्येकाचे जीवन असणे आवश्यक आहे. जीवन हे यज्ञ असावे. पूर्वी यज्ञामुळे औषधीद्रव्य मिळायचे. परंतु आता यज्ञ संस्कृतीच लोप पावली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुराणांची रचना मृत्यूनंतर स्वर्ग मिळण्यासाठी नव्हे तर याच जगाला स्वर्ग करण्यासाठी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. स्वानंद पुंड यांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, ५१ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मानपत्राचे वाचन प्रसन्न बारलिंगे यांनी केले. संचालन श्रद्धा भारद्वाज यांनी केले. आभार प्रसन्न बारलिंगे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.