नागपूर : वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्यानंतर एकाकी पडलेल्या एका महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना जरीपटका भागात गुरुवारी रात्री घडली व शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला.
डॉ. आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने त्यांच्या वृद्ध आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. तर, सुसाईड नोटमुळे या आत्महत्येच्या प्रकरणात कुणावरही संशय घ्यायला वाव नसल्याने पोलिसांना आता वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.
सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे एमबीबीएस, एमडी झाले होते. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करायच्या. २०१६ मध्ये आकांक्षाचे लग्न झाले होते. मात्र, वैवाहिक जीवनात कटुता आल्याने आकांक्षा आणि त्यांचे पती परस्पर संमतीने वेगळे झाले होते. दरम्यान, आकांक्षा नागपुरात परतल्या आणि जरीपटक्याच्या नागसेन नगरातील वडिलांच्या निवासस्थानी राहू लागल्या.
गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आईवडिलांनी त्यांची रुम गाठली असता त्या बेडवर बेशुद्धावस्थेत आढळल्या. बाजूलाच काही सिरिंज पडून होत्या. काहीतरी घडल्याचा संशय आल्याने आईवडिलांनी लगेच डॉक्टरला बोलविले. मात्र, डॉक्टरांनी आकांक्षा यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय नाईकवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आकांक्षाच्या रुमची तपासणी केली असता एक सुसाईड नोट आढळली. त्यातून आकांक्षा यांना एकाकी पडल्याच्या भावनेने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. आकांक्षाच्या या आत्मघाती पावलामुळे त्यांच्या वृद्ध आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, आकांक्षाने नेमके कोणते इंजेक्शन घेतले ते वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे आम्हाला वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे ठाणेदार वैभव जाधव यांनी लोकमतला सांगितले.