नागपूर : नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या खापा वन परिक्षेत्रामध्ये गुरुवारी दुपारी मादी बिबट्यासह तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला. मादी साडेचार वर्षांची तर पिल्लू फक्त ४ महिन्याचे आहे. कोरड्या पडलेल्या नाल्यामध्ये हे दोन्ही प्राणी मृतावस्थेत आढळून आले. यावरून उष्माघाताने आणि तहान-भूकेने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे.
मोहगाव-पेंढरी नाला बिटातील कोथुळना सहवनपरिक्षेत्र खुबाळा येथील मोहगाव-पेंढरीच्या नाल्यामध्ये हा प्रकार आढळून आला. वनकर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान पिल्लू आणि त्याची आई मृतावस्थेत आढळताच वरिष्ठांना त्याची माहिती देण्यात आली. या दोन्ही प्राण्यांचे सर्व अवयव शाबूत होते. भुकेमुळे किंवा उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. वनविभागाच्या परवानगीनंतर या दोघांचेही शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहिणी बावसकर, रेस्क्यू सेंटरचे डॉ. सय्यद बिलाल, मानद वन्यजीवरक्षक प्रतिनिधी आकाश कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याच्या शरीराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे खापा वनपरिक्षेत्र अधिकारी पी. ए. नाईक यांनी सांगितले.
...
विजेचा सापळा तर नव्हे ?
एकाच वेळी बिबट्या मादी आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यामुळे हा वीज प्रवाहाचा सापळा लावून केलेल्या शिकारीचा प्रयत्न तर नसावा, अशीही शंका व्यक्त होत आहे. या परिसरामध्ये यापूर्वीही पिंजरे लावून शिकार करण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या दृष्टीनेही या घटनेकडे पाहिले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच यावर प्रकाश पडणार आहे.
...