नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तैनात एका महिला पोलीस शिपायाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना बोरकर ले-आऊटमध्ये घडली. या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
अश्विनी धनंजय खंडागळे (वय ३०) असे मृत महिला शिपायाचे नाव आहे. अश्विनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तैनात होती. तिचा पती धनंजय बीएसएफमध्ये आहे. धनंजय भारत-नेपाळच्या सीमेवर तैनात आहे. तो २० दिवसांपूर्वी सुटीवर आला होता. कुटुंबात पती, सासू शोभा तसेच दोन वर्षाची मुलगी आहे. धनंजयचा भाऊ दीपक बारामतीत अभियंता आहे. धनंजयच्या तीन बहिणी आहेत. एका बहिणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या दोन्ही मुली धनंजयच्या आईसोबत राहतात.
अश्विनीची नवरात्रीत कोराडी मंदिरात बंदोबस्तात ड्युटी लागली होती. त्यानंतर ती गैरहजर होती. त्याचे कारण तिने कुणालाही सांगितले नाही. धनंजयची एक बहीण परिसरातच राहते. तिच्या घरी गुरुवारी सायंकाळी तुलसी पूजनाचा कार्यक्रम होता. अश्विनीचे कुटुंबीय तुलसी पूजनासाठी गेले होते. अश्विनीने प्रकृती ठीक नसल्यामुळे घरी राहण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबीय गेल्यानंतर अश्विनीने सिलिंग फॅनला दुपट्टा बांधून गळफास घेतला. रात्री ९.१५ वाजता कुटुंबीय घरी पोहोचल्यानंतर त्यांनी अश्विनीला आवाज दिला. तिने दरवाजा न उघडल्यामुळे खिडकीतून आत पाहिले असता, ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. दरवाजा तोडून तिला खाली उतरविण्यात आले. त्यावेळी अश्विनीने या जगाचा निरोप घेतला होता.
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, त्यांना मृत्यूपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. अश्विनी काही दिवसांपासून तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिचे कुटुंबीयही चिंतेत होते. हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे हुडकेश्वर पोलिसात खळबळ उडाली आहे. अश्विनी मूळची औरंगाबाद येथील रहिवासी आहे. तिच्या कुटुंबियांचे बयाण नोंदविल्यानंतर तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकते.