लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : विद्युत बिलाच्या थकबाकीवरून वीजपुरवठा खंडित केल्यावरून संतप्त माजी नगरसेवकाने महिला वीज कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना शहरातील माेदी पडाव भागात शनिवारी (दि. २८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी माजी नगरसेवक संताेष यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास वीज कंपनीचे पथक माेदी पडाव भागात थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले हाेते. माजी नगरसेवक संताेष यादव यांच्या घरी जाऊन कर्मचाऱ्यांनी थकीत वीजबिलाची मागणी केली असता, त्यांनी बिल देण्यास असमर्थता दाखविली. यामुळे कर्तव्यावर असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी यादव यांच्याकडील वीजपुरवठा खंडित केला. यावर संतापलेल्या यादव यांनी पथकातील महिला कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना लाकडी काठीने मारहाण केली. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी वीज कंपनीच्या कर्मचारी वैशाली दिलीप सहारे (२७, रा. दहेगाव जाेशी, ता. पारशिवनी) यांच्या तक्रारीवरून कामठी (जुनी) पाेलिसांनी आराेपी माजी नगरसेवक संताेष यादव (४५, रा. माेदी पडाव, कामठी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाेलीस ठाणे गाठून घटनेचा निषेध नाेंदविला. आराेपीवर कडक कारवाईची मागणी कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.