लाेकमत न्यूज नेटवर्क
बेलाेना : शेतजमिनीची आराेग्य देखभाल काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या शेतजमिनीची देखभाल करून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करावा तसेच शेतजमिनीची गुणवत्ता व पाेत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी शेतकऱ्यांना दिला.
गाेंडेगाव येथे शेतमीन आराेग्य देखभाल कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी कृषी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य दिवाकर नागमाेते हाेते. याप्रसंगी ज्ञानेश्वर मुलताईकर, प्रमुख वक्ते म्हणून मंडळ कृषी अधिकारी साेपान लांडे, कृषी पर्यवेक्षक नरेंद्र बांबल, कृषी सहायक अमरदीप रामटेके, गाेपाल मानकर, रंजित खंडाळकर, कविता निलेवार यांच्यासह प्रगतिशील शेतकरी किशाेर भाेयर, कृषिमित्र अजय डवरे, प्रफुल्ल नागमाेते, सुनील धुर्वे, रत्नाकर कुरेकर, पवन भैया आदी उपस्थित हाेते.
सध्या कपाशीवर माेठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व बाेंडअळीमुळे पिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी किशाेर भाेयर यांनी व्यक्त केले. या वेळी शेतजमिनीच्या आराेग्य पत्रिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात कापूस फरतड, हरभऱ्यावरील घाटेअळीचे निर्मूलन, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन तसेच कृषी विभागाच्या विविध याेजनांची माहिती देण्यात आली. संत्रा-माेसंबीवरील राेग व कीड व्यवस्थापन याबाबत नरेंद्र बांबल यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आवश्यक ती याेग्य खते वापरावी व सेंद्रिय खतांचा अधिक वापर करून उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन ज्ञानेश्वर मुलताईकर यांनी केले. कार्यक्रमाला गाेंडेगाव, मानेवाडा परिसरातील शेतकरी माेठ्या संख्येत उपस्थित हाेते.