लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : मृदा आराेग्य जपण्यासाठी पिकांना देण्यात येणारी खते याेग्य प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पाेत बिघडणार नाही. शिवाय त्यामुळे उत्पादनही भरघाेस मिळेल. पिकांना आवश्यक असलेल्या रासायनिक खतांमध्ये इतर पर्याय वापरल्यास १० टक्के खताची बचत करता येईल, असा मूलमंत्र कृषी संजीवनी माेहिमेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जात आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २१ जून ते १ जुलैपर्यंत तालुक्यात कृषी संजीवनी माेहीम राबविली जात आहे. कृषी विभागाची चमू प्रत्येक गावागावात दाखल हाेत पी. उत्पादन तंत्रज्ञानातील बाबींबाबत मेळावे घेत आहेत. या माेहिमेंतर्गत नवेगाव (देशमुख) येथे मार्गदर्शन सभेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, मंडळ अधिकारी श्याम गिरी, कृषी पर्यवेक्षक संदीप झाडे, कृषी सेवक सचिन टावरी, शेतकरी कवडू गायकवाड आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाच टक्के निंबोळी अर्क तयार करून फवारणी करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणे, एकात्मिक किड व्यवस्थापन, पक्षी थांब्याचा वापर करणे आदी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. यावेळी दिनेश चौधरी यांच्या शेतातील सरी वरंबा पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. पिकांना द्यावयाच्या खत मात्रेत १० टक्के बचत करून त्याएवेजी सेंद्रिय खत, गांडुळ खत वापरणे, जिवाणू संवर्धकाची बियाण्याला बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचा वापर करणे, पिकांना फवारणीद्वारे खत देणे आदी पर्यायांचा वापर करता येतो, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी दिली. यावेळी माेठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.