लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधने आली असली तरी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व बृृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा विषय घेऊन घरगुती गणेशाेत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यादरम्यान मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. ही स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे.
मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे व मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये मताधिकाराबाबत जागृती करण्यासाठी अभिनव कल्पना राबविणे, जात-धर्म न पाहता आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकाराचा वापर करणे, यासारख्या विषयावर सजावटीच्या माध्यमातून जनजागृती करता येईल.
या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणुकीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची जनजागृती केली जाईल. यात मंडळांमध्ये मतदार नोंदणीसाठी आवाहन करणारे बॅनर लावणे, व्हिडीओ क्लिप्स, घोषवाक्ये आदींद्वारे जनजागृती करणे अपेक्षित आहे.