प्रशासनाचा निर्णय : पुढील सत्रापासून अंमलबजावणी नागपूर : एरवी स्वातंत्र्यदिन किंवा गणतंत्रदिनी शाळांमध्ये नामवंत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. परंतु पुढील शैक्षणिक सत्रापासून हा मान शाळांमधील विद्यार्थिनींनाच मिळणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेतर्फे ‘बेटी बटाव,बेटी पढाओ’ ही योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गतच पुढील शैक्षणिक सत्रापासून मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने निर्देश जारी केले असून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविण्यात आले आहे.महिला सशक्तीकरण व महिला आरक्षण योजनांना बळकटी मिळावी यासाठी मनपा शाळेतील हुशार व होतकरु मुलींच्या हस्ते १५ आॅगस्टपासून ध्वजारोहण व्हावे, यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण समितीचे सभापती गोपाळ बोहरे यांनी सादर केला होता. त्यानंतर त्यांनी या मुद्याचा सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात मनपाने कायदेशीर सल्ला घेतला. कायदेतज्ज्ञांनी या प्रस्तावास सकारात्मक उत्तर दिले व अशी योजना राबविण्यात काहीच अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर मनपाने १५ आॅगस्ट २०१६ पासून शाळांमधील हुशार मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे निर्देश जारी केले आहेत. महिला सक्षमीकरणाच्या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलजबावणीसाठी हे पाऊल आहे.(प्रतिनिधी)
विद्यार्थिनी करणार मनपा शाळांतील ध्वजारोहण
By admin | Published: March 20, 2016 2:44 AM