निशांत वानखेडे, नागपूर : सूर्याच्या तापामुळे हाेरपळणाऱ्या विदर्भातील नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे दाेन दिवस आणखी ताप सहन केल्यानंतर त्यापुढचे चार दिवस ‘अवकाळी’चा गारवा मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे १६ ते १९ मार्चदरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यात अगदीच किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
उन्हाळा सुरू हाेताच सूर्याने पुन्हा आग ओकणे सुरू केले असून विदर्भावर तीव्रता जरा जास्तच आहे. नागपूरचा पारा २४ तासात अंशत: वाढून बुधवारी ३८.७ अंशावर पाेहचला, जाे सरासरीपेक्षा ३.१ अंशाने अधिक आहे. ३९.४ अंशासह चंद्रपूर व ३९ अंशासह यवतमाळ सर्वाधिक तापत आहेत. वर्धा अंशत: वाढून ३८.८ अंशावर गेला आहे, तर अकाेला, वाशिम, गाेंदिया, अमरावतीत अंशत: घट हाेत तापमान अनुक्रमे ३८ अंश, ३८.४ अंश, ३७ अंश व ३६.४ अंशावर आहे. रात्रीच्या उष्णतेतही वाढ झाली आहे.
दरम्यान १६ मार्चपासून चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र नागपूर, अमरावती, गाेंदिया व गडचिराेली या चारच जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. शेतकरी रबी पिक काढण्याची लगबगीत लागले आहेत. मात्र अवकाळीच्या शक्यतेने घाबरण्याची गरज नाही, असे अवाहन हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण अवकाळीचा पाऊस हा अगदीच किरकाेळ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल असे सांगण्यात येत आहे.