नागपूर : कोरोनाचा धोका पुन्हा वाढतो आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोनाबाधितांची दोन आकडी संख्या गाठली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. सरकारनेही कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ ते १२ च्या शाळा सुरू केल्या होत्या. पुढे उच्च प्राथमिक शाळाही सुरू करण्याचा बेत होता. त्या अनुषंगाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने ५ सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या दोन्ही लस घेण्यासाठी डेडलाइन दिली होती. नागपूर जिल्ह्यात ३४ हजारांवर शिक्षक असून, आरोग्याची कारणे व काही वैयक्तिक अपवाद बहुतांश शिक्षकांनी लसीकरण केले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासनाने ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू केल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापपर्यंत ७० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु महापालिकेच्या हद्दीतील एकही शाळा अजूनही सुरू होऊ शकली नाही; पण शासनाने जेव्हा- जेव्हा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा- तेव्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या अनिवार्य केल्या होत्या. जुलै महिन्यात शाळा सुरू करीत असताना शिक्षकांचे लसीकरणही बंधनकारक केले होते. नागपूर जिल्ह्यात पहिला डोस १०० टक्के शिक्षकांचा झाल्याचा शिक्षण विभागाचा दावा होता. दुसऱ्या डोसपासून १० ते १२ टक्के शिक्षक वंचित होते; पण शासनाने ५ डिसेंबरची डेडलाइन दिल्याने या शिक्षकांनीही लसीकरण करून घेतल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
- जिल्ह्यातील शाळेचा आढावा
संस्था शाळा शिक्षक
जिल्हा परिषद १५३० ४४००
नगर परिषद ६८ ५२४
महापालिका १५६ १२४९
अनुदानित शाळा १२०३ १४९७२
विना अनुदानित शाळा ११५५ १३४५०
- जिल्ह्यात शिक्षक व शिक्षकेतरांचा लसीकरणाला प्रतिसाद
एखाद्याला लसीवर विश्वासच नसेल किंवा त्याला घ्यायची नसेल, अशाच शिक्षकाने लसीकरण केले नाही; अन्यथा लसीकरण न केलेल्या शिक्षकांची जी काही तुरळक कारणे आली त्यात आरोग्यासंदर्भातील आहे. अशांची संख्या अतिशय कमी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.