लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी संपली. मात्र प्रचारतोफा थंडावताच सोशल मीडियावरून वॉरला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर वॉच ठेवणारी यंत्रणा सायबर सेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने या नियंत्रणासाठी मदतीला घेतली असली तरी सोशल मीडियावचा छुपा प्रचार मात्र धडाकून सुरू आहे.शनिवारी सायंकाळी प्रचार संपला असल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला ३६ तास बाकी उरतात. सोमवारी २१ आॅक्टोबरला मतदान आहे. या मिळालेल्या वेळेचा बहुतेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारासाठी उपयोग करून घेतल्याचे चित्र आहे. एमएमएस, व्हाईस मॅसेज या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. अनेक उमेदवारांनी ठरविलेले प्रचाराच्या व्हाईस मॅॅसेजचे पॅकेज शनिवारपासून अचानकपणे कार्यरत झाले असून, अनेकांच्या मोबाईलवर या माध्यमातून उमेदवारांचा आवाज पोहचत आहे. यासोबतच व्हॉटस्अॅप, फेसबुकच्या माध्यमातूनही आपल्या नेत्याची हवा तयार करणे कार्यकर्त्यांकडून सुरूच आहे.विशेष म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियाचा वापर चालणार आहे. यामुळे खुला प्रचार संपला असला तरी छुपा प्रचार मात्र वेगात सुरू झाला आहे. सोशल मीडियावरून सुरू असलेल्या या प्रचाराचा अनुभव अनेक मतदारांना आला आहे.
सायबर सेलकडे यंत्रणाच नाहीया सर्व प्रकारांवर वॉच ठेवणारी सक्षम यंत्रणाच सायबर सेलकडे नसल्याचे दिसत आहे. मोबाईलधारकांची आणि त्याच्या वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामत: सोशल मीडियावरील प्रचाराला आवर घालताना यंत्रणेची दमछाक होत आहे.