गणेश हूड
नागपूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आता स्थिरावले आहेत. एप्रिल अखेरिस कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी जिल्ह्यांतर्गत बदल्या होतात. बदली सत्राची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे अनेकांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आवडत्या ठिकाणी बदलीसाठी फिल्डींगही लावली आहे.
जे कर्मचारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे. अशा कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. समुपदेशन पध्दतीने बदल्या करण्यात येणार आहे. यंदा ९ ते १२ मे दरम्यान बदली प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. कृषी, वित्त, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, आरोग्य, सामान्य प्रशासन, पंचायत, शिक्षण आदी विभागाची बदली प्रक्रिया पार पडणार आहे. बदली सत्राची चाहुल लागताच जिल्हा परिषदेकडे कधीही न भटकणाऱ्यांच्या चकरा वाढल्या आहेत. आठवडाभरापासून शिक्षण व सामान्य प्रशासन विभागात कर्मचाऱ्यांची गर्दी वाढली आहे. पदाधिकारी अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलावून सूचना देत आहे. बदल्यात मोठ्याप्रमाणात घोडेबाजार होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत दबक्या आावजात चालू आहे.शिक्षकांच्या बदल्यातही सेटिंगचे प्रयत्नशिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. यात ९०६ शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रीया सुरू आहे. शिक्षकांच्या बदल्यासाठी शासनाने निकष ठरविले आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांचे समायोजन व पदोन्नतीनंतर रिक्त झालेल्या जागेवर समायोजन सुरू आहे. नागपूर शहारापासून जवळ असलेल्या शाळांसाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे प्रक्रीया ऑनलाईन असली तरी यातून मार्ग काढणारे अनेक तरबेज कामाला लागले आहे. पदाधिकाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंतचे वजन वापरले जात आहे.