नागपूर: भांडे प्लॉट आणि पारडी भागात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या. एका घटनेत घरातील धान्य, कपडे आणि जिवनावश्यक वस्तूंसह काही रक्कमही जळून खाक झाली. तर, दसुऱ्या घटनेत एका दुकानातील फर्निचरचा अक्षरश: कोळसा झाला.
उमरेड मार्गावर भांडे प्लॉट परिसरात हरपूर नगर आहे. येथे राहणारे विनोद केवलराम हटवार यांच्या घराला रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत घरातील धान्य, कपडे, खान्यापिण्याच्या चिजवस्तू, महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम जळून खाक झाली. आगीच्या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच सक्करदरा अग्निशमन केंद्रातून पाण्याचे बंब पाठविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत घरातील एक ते दोन लाखांचे सामान जळून खाक झाले होते. गरिब परिस्थिती असलेल्या हटवार कुटुंबियांसमोर आगीच्या या घटनेमुळे आता कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेताजीनगरात फर्निचरचे दुकान जळालेपारडीतील नेताजीनगरात असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे ३ च्या सुमारास भीषण आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर असल्यामुळे अल्पावधीतच आगीने भीषण रुप धारण केले. बघता बघता आगीत लाकडी दरवाजे, दाराच्या चाैकटी, लाकडी पाट्यांचा कोळसा झाला. परिसरातील नागरिकांनी माहिती कळविल्यानंतर अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत दोन ते तीन लाख रुपयांचे फर्निचर जळाल्याचा अंदाज आहे.दोन्ही ठिकाणी आग नेमकी कशी लागली, ते स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या घटनांची चाैकशी केली जात आहे.