नागपूर : शहरात आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. अवघ्या बारा तासांत चार ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. पण आगीची सर्वाधिक भीषणता गोरेवाड्याच्या जंगलात बघायला मिळाली. येथील १५० हेक्टरवरील जंगल आगीत खाक झाल्याची माहिती आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाव्हा व दाभा भागाला लागून असलेल्या गोरेवाडा प्रकल्पाच्या युनिट-२ च्या भागात दुपारी १२.३० वाजता आग लागली. हवेच्या वाढत्या जोरामुळे व वाळलेले गवत आणि झुडपांमुळे आगीने चांगलाच पेट घेतला. गोरेवाडातील १५० हून अधिक वनकर्मचारी फायर बिटर्स व ब्लोअर घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागले. आगीची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर मनपाच्या सिव्हिल लाईन्स, सुगतनगर, कॉटन मार्केट व गंजी पेठ येथून चार गाड्यांसह मोठ्या संख्येने फायरमनची टीम गोरेवाड्यात पोहोचली.
आग दोन भागांत लागल्याने दोन वेगवेगळ्या टीम तयार करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. दुपारी २ वाजता आग गोरेवाडा सफारीच्या दिशेने पसरत असल्याने वनविभागाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सराफी बंद केली. ५ तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभाग व अग्निशमन विभागाला यश आले. प्राणी संग्रहालयापर्यंत आग पोहोचू शकली नाही. वन्य प्राण्यांना कुठलाही धोका झाला नाही.
- झुडपांमध्ये लागली आग
शहरातील मनीष नगरातील हल्दीराम व लक्ष्मीनगरातील आरटीपीएसच्या जवळच्या झुडपी भागात दुपारी १२ वाजता आग लागण्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनेतील आगीचे कारण वाळलेले गवत व झुडपे असल्याचे निदर्शनास आले.
- वर्धमाननगरातील घराला आग
वर्धमाननगर येथील एका इमारतीला शनिवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत स्थानिक रहिवासी विनोद खन्ना व संजय खन्ना यांच्या घरातील ३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळाल्याबरोबर लकडगंज व गंजी पेठ येथील दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आहे.