संपत्तीचा वाद : सख्खे झाले वैरीनागपूर : पारिवारिक संपत्तीच्या वादातून निराधार महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. पाचपावलीत रविवारी रात्री ८ वाजता ही संतापजनक घटना घडली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप आहे. अवतारसिंग मारवाह आणि रखपालसिंग मारवाह अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पाचपावलीतील वैशालीनगरात आंबेडकर गार्डनजवळ राहतात. पीडित महिला (वय ४८) आरोपींची सख्खी नातेवाईक आहे. तिच्या पतीच्या पारिवारिक संपत्तीचा हिस्सा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ती आरोपींसोबत लढत आहे. हा वाद अनेकदा पोलीस ठाण्यातही गेला. मात्र, आरोपी पैशाच्या बळावर महिलेचा आवाज दाबत आहे. चार महिन्यांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण गुरुद्वारा पंच कमिटीकडे गेले. त्यावेळी तेथे आरोपी अवतारसिंग आणि रखपालसिंग यांनी पीडित महिलेच्या मुलाला २ ट्रक आणि १५ लाख रुपये देण्याची कबुली दिली. पोलिसांकडेही तसेच सांगितले. दर तीन महिन्यानंतर ३ लाखांची किस्त देण्याचे ठरले. दोन्ही गटाला हा तोडगा मान्य असल्यामुळे पंचकमिटीने हा वाद निकाली काढला. दरम्यान, वारंवार मागणी करूनही पीडित महिलेला अवतारसिंग आणि रखपालसिंगने ट्रक अथवा रक्कम दिली नाही. त्यामुळे पीडित महिलेने पाचपावली ठाण्यात दाद मागितली. पोलिसांकडून आरोपींना ही माहिती कळताच त्यांनी रविवारी पीडित महिलेला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. यापुढे कुणाकडे तक्रार केली तर जीवे ठार मारू,अशी धमकीही दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी विनयभंगासह जुजबी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. पोलीस या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाचपावलीत निराधार महिलेला मारहाण
By admin | Published: May 06, 2014 10:40 PM