लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्केटिंगच्या माध्यमातून जागतिक पातळीवर लक्ष वेधणाऱ्या उमरेड कन्येने पाचव्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर आपले नाव कोरले. उमरेड वेकोलि निवासी सृष्टी धर्मेंद्र शर्माच्या या गगनभरारीने सर्वांना चकित केले असून, तिच्या या अतुलनीय कामगिरीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
सृष्टी शर्मा हिने यापूर्वी केलेला स्वत:चाच रेकॉर्ड मोडला. ४ ऑगस्टला याबाबतची पुष्टी करणारा मेल तिला प्राप्त झाला. ‘फास्टेस्ट टाइम टू लिम्बो स्केट अंडर १० बार्स’ स्केटिंगच्या या वर्ग प्रकारात सृष्टी यशस्वी ठरली होती. २० फेब्रुवारी २०२१ ला वेकोलि उमरेड येथील स्केटिंग रिंकवर तिने ही कामगिरी पार पाडली होती.
सृष्टीने तिसऱ्यांदा प्रयत्न करीत हा रेकॉर्ड पूर्ण करीत यश पटकावले. पहिल्या प्रयत्नात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १.७२० सेकंदांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. सृष्टीने हे लक्ष्य १.७०५ सेकंदांत गाठत ऐतिहासिक नोंद केली. दुसऱ्या प्रयत्नात १.६९७ सेकंद, तसेच तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात १.६९४ सेकंदांत अंतर पार करीत जागतिक नोंद झाली. याबाबत रेकॉर्डचे पुरावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटवर ४ एप्रिल २०२१ ला अपलोड करण्यात आले होते. संपूर्ण निरीक्षणाअंती चार महिन्यांत हा निकाल जाहीर करण्यात आला.
आतापर्यंत ‘फास्टेस्ट टाइम टू लिम्बो स्केट अंडर १० बार्स’ या प्रकारासाठी सृष्टीने तीनदा प्रयत्न केले होते. त्यात काही उणिवा आढळून आल्याने ती रेकॉर्डपासून वंचित राहिली होती. अशाही परिस्थितीत ती परिस्थितीशी लढली आणि तिने हे सुयश संपादन केले.
सृष्टीने आतापर्यंत पाच वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. लोवेस्ट लिम्बो स्केटिंग ओवर १० मीटर्समध्ये २३ ऑगस्ट २०१४ ला पहिल्या रेकॉर्डची नोंद झाली. ७ ऑक्टाेबर २०१५ ला याच प्रकारातील २५ मीटर्स, २८ सप्टेंबर २०१७ ला १० मीटर्स, २८ जानेवारी २०२० ला, तसेच २० फेब्रुवारी २०२१ ला पाचव्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यशस्वी ठरली आहे. रोलर हॉकी आणि शाॅर्ट ट्रॅक आइस स्केटिंग प्रकारात राज्याचे प्रत्येकी तीनदा सृष्टीने नेतृत्व केले आहे. जगभरात प्रथम आइस लिम्बो स्केटरचा पुरस्कार पटकाविणारी सृष्टी असून, तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण जागतिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चीनचा रेकॉर्ड मोडणार?
‘फास्टेस्ट टाइम टू लिम्बो स्केट ओवर ५० मीटर बार’ या प्रकारात ७.९७४ सेकंद असा रेकॉर्ड आहे. चीनच्या के वू सवे च्या नावाने या गिनीज रेकॉर्डची नोंद आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी सृष्टी जिवापाड मेहनत घेत आहे. चीनचा हा रेकॉर्ड सृष्टी मोडणार काय, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘लोकमत’ सोबतीला
अगदी १० वर्षांची असताना सृष्टीने ‘लोकमत’ समूहासोबत आपल्या अभियानाचा प्रारंभ केला होता. लोकमत एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या कामगिरीचे कौतुक केले. ‘लोकमत’ सोबतीला असल्याचा शब्द दिला. त्यानंतर सृष्टीने कधीही मागे वळून बघितले नाही. तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण यशात ‘लोकमत’चा सिंहाचा वाटा आहे, असे मत तिचे वडील धमेंद्र शर्मा यांनी कृतज्ञतापूर्वक व्यक्त केले.