लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नागपुरात २५ झाली असली तरी आतापर्यंत यातील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी पाचव्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देताना डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद होता. रुग्णाने या प्रत्येकाचे आभार मानले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांना भीती न बाळगण्याचे, मात्र काळजी घेण्याचे व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही केले. मेयोमध्ये २५ मार्चपासून हा रुग्ण भरती होता. नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. दुसऱ्याच दिवशी त्यांची पत्नी व अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोन पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या तिघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. पहिल्या रुग्णाचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना २६ मार्च रोजी, दोन रुग्णाला २८ मार्च रोजी तर पहिल्या रुग्णाच्या पत्नीला २९ मार्च रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्यांच्या मनावरीलही काहीसे दडपण कमी झाले होते. परंतु पहिल्या रुग्णाला सुटी देण्याच्या एक दिवसापूर्वी पाचव्या रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. आज हा रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जाताना पाहतानाचा आनंद सर्वांना होत होता. काहींनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कोरोनामुक्त झालेल्यांसोबत त्याचे नातेवाईक व मित्र सोबत होते. सुटी होण्यापूर्वी कोरोनामुक्त व्यक्तीने तेथील डॉक्टर व परिचारिकांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. हे बंदिस्त १४ दिवस बरेच काही शिकवूनही गेले असेही तो म्हणाला. रुग्णालयातून सुटी झाली तरी पुढील १४ दिवस त्यांना घरीच राहण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणेने दिला आहे. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी कोरोनाबाधितांच्या रुग्णसेवेत असलेले सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.१० बाधितही लवकरच घरीपाचव्या रुग्णापासून बाधित झालेल्या १० मधून ४ रुग्णांना उद्या शनिवारी १४ दिवस पूर्ण होत आहेत. त्यांचेही नमुने निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी पाठविले जाणार आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या परंतु पहिला नमुना निगेटिव्ह आलेल्यांना आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यांचेही नमुने तपासले जाणार असून त्यानुसार त्यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. अशा संशयितांची संख्या १४वर असल्याचे सांगण्यात येते.