नागपूर : पित्याचे मुलीकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहून एका आरोपीने पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले. आज सकाळी १०च्या सुमारास नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील रिझर्व्हेशन काउंटरवर हा प्रकार घडला. पोलिसांनी लगेच सतर्कता दाखवल्यामुळे आणि त्यांना ऑटोचालकाची साथ मिळाल्याने दोन तासांतच आरोपी आणि मुलीला शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले.
शामकुमार पुनितराम ध्रुव (३०) असे आरोपीचे नाव आहे. तो छत्तीसगडमधील मुंगेरी, बिलासपूर येथील रहिवासी आहे. फिर्यादीचे नाव राजू दिलीप छत्रपाल (वय ३४) असून ते दहिबाजार पुलाजवळ राहतात. राजू धंतोलीतील एका लॅबमध्ये कार्यरत आहेत.
राजू आपल्या पावणेतीन वर्षांच्या उर्मी नामक मुलीला घेऊन नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावर आज सकाळी दहाच्या सुमारास आले. त्यांना पश्चिम बंगालला जाण्यासाठी रेल्वे गाडीचे रिझर्व्हेशन करायचे होते. त्यासाठी ते रांगेत राहिले. तेथे गर्दी असल्यामुळे त्यांनी मुलीला कडेवरून खाली उतरवले. तिकिटसाठी आवश्यक फॉर्म भरत असताना त्यांचे दुर्लक्ष झाल्याची संधी साधून आरोपीने त्या चिमुकलीला उचलून तिथून पळ काढला. मुलगी दिसत नसल्याचे पाहून राजूने आरडाओरड केली. लगेच रेल्वे पोलिसांना माहिती दिली. एपीआय पंजाबराव डोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेची लगेच शहर पोलिस तसेच रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देऊन मुलीच्या शोधासाठी धावपळ सुरू केली.
सर्फराजची टिप कामी आली
पोलिसांनी घटनास्थळ आणि रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता त्यात आरोपी चिमुकल्या उर्मीला घेऊन ऑटोत बसून जाताना दिसला. त्या ऑटोच्या नंबरवरून पोलिसांनी ऑटोचालकाशी संपर्क केला. ऑटोचालक सरफराज अली याने आरोपी आणि मुलीला मुख्य रेल्वेस्थानकाजवळ सोडल्याचे सांगितले. त्यावरून ईतवारी पोलिसांनी मुख्य रेल्वेस्थानकाच्या जीआरपीला माहिती दिली.
अन पोलिसांनी पकडली गचांडीअपहरणाच्या गुन्ह्याची माहिती मिळताच आरोपी आणि अपहृत मुलीच्या शोधासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर पोलिस निरीक्षक मनीषा काशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळे विणले. वेगवेगळ्या ठिकाणी ते आरोपीला शोधू लागले. आरोपी शामकुमार ध्रुव फलाट क्रमांक एकवर आढळताच त्याची गचांडी धरून पोलिसांनी त्याच्या ताब्यातील उर्मीला ताब्यात घेतले.
सर्वांनीच टाकला सुटकेचा निःश्वास
आरोपी शामकुमार पुनितराम ध्रुव आणि अपहृत चिमुकली सापडल्याचे कळताच रेल्वे पोलिसांचा ताफा मुख्य रेल्वेस्थानकावर पोहोचला. तेथे अपहृत चिमुकली सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. रेल्वे पोलीसचे अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ईतवारीचे ठाणेदार पंजाबराव डोळे, पीएसआय अविनाश नारनवरे, हवलदार विजय सुरवाडे, शिपायी धम्मपाल गवई, अमित अवतारे, प्रमोद पिकलमुंडे, शबाना पठाण, दीप्ती भेंडे, रजनी शर्मा आणि अर्चना सोनटक्के तसेच मुख्य स्थानकाच्या रेल्वेच्या ठाणेदार मनीषा काशिद आणि सहकाऱ्यांनी अपहृत उर्मिला अवघ्या दोन तासांत शोधून आरोपीच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी बजावली.