लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाइन औषध खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाच्या मोबाईलवर फोन करून सायबर गुन्हेगाराने त्याचे पावणेदोन लाख रुपये लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली. अनिरुद्ध वसंत मायंदे (३२) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. ते पुण्याच्या एका कंपनीत काम करतात. ते सोनेगावच्या पराते नगरात राहतात. रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांनी गुगलवर पाहिजे असलेले औषध शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अनिरुद्ध यांना सायबर गुन्हेगाराचा फोन आला. तुम्हाला पाहिजे असलेल्या औषधाची होम डिलिव्हरी मिळेल, असे सांगून ऑनलाइन कार्ड पेमेंट करण्याची अट सांगितली. अनिरुद्ध यांना आरोपीने आपले क्रेडिट कार्ड नंबर आणि मोबाईलवर पाठविलेला ओटीपी नंबरही विचारला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १,८१,४७० रुपये काढून घेतले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर अनिरुद्ध यांनी सोमवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. चौकशीअंती पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
--