लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वेळ पाळावी, कामात शिस्तबद्धता यावी म्हणून मेडिकलचे दोन प्रवेशद्वार सोडल्यास इतर सर्व प्रवेशद्वार सकाळच्या वेळी बंद करण्यात येतात. गुरुवारी बंद दरवाजा उघडण्यावरून कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा निषेध करीत कर्मचाऱ्यांनी दोन तास काम बंद ठेवले होते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजण्यापूर्वी आपआपल्या कक्षात हजर रहावे, यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकलच्या कॅन्टिनकडील तीनही प्रवेशद्वार, मॉर्ड होस्टेलकडील प्रवेशद्वार सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर दरवाजे बंद होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. परंतु अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या सूचना कायम ठेवल्या. याचे पडसाद म्हणून मंगळवारच्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मेडिकलच्या अभिलेखागार विभागाचे प्रमुख सुधाकर लाडे हे सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी डॉक्टरांच्या कॅन्टिनकडील बंद दरवाजाजवळ आले. येथे कर्तव्यावर असलेल्या युनिटी कंपनीच्या सुरक्षा रक्षक मेंढेला दरवाजा उघडण्यास सांगितले. रक्षकाने प्रवेशद्वार ११.३० नंतर उघडेल असे सांगितले. यावरून दोघांमध्ये जुंपली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वरिष्ठांना याची माहिती मिळताच त्यांनी हे प्रकरण निस्तारले. परंतु कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात सर्व कर्मचारी एकत्र आले. ते संपावर जाण्याच्या तयारीत होते. या दरम्यान वरिष्ठांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. यात लाडे यांनी सुरक्षा रक्षकावर हात उगारल्याचे समोर आले. याची माहिती कर्मचाऱ्यांना दिल्यावर कर्मचारी आपआपल्या कामावर परतले. परंतु या घडामोडीत दोन तास काम बंद होते. याचा फटका विविध कामानिमित्त आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसला.