लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत. गरुड त्याला चोचीने पुन्हा पकडू पाहतो तर साप त्याला दंश करून हरवू पाहतो.. दोघेही प्राणपणाने लढत राहतात.. एका क्षणाला तर सापाला गिळायला तोंड उघडलेल्या गरुडाच्या जिभेला साप जोरदार दंश करतो... पाहता पाहता गरुडाच्या चोचीने घायाळ झालेला साप अर्धमेला होतो आणि काहीवेळाने गरुड त्याला आपले भक्ष्य बनवतो..वन्यप्राण्यांच्या जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या कुठल्याशा वाहिनीवरचे हे दृश्य नाही.. ते आहे नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील खूर्सापार गावाजवळचे. हृदयाचे ठोके रोखून धरून पाहत हा संपूर्ण घटनाक्रम चित्रबद्ध केला आहे नागपूरचे छायाचित्रकार नितीन मराठे यांनी.क्रिस्टेड सर्पेंट ईगल ज्याला मराठीत तुर्रेवाला गरुड म्हणता येईल आणि स्ट्रिप्ड कीलबॅक असे इंग्रजी नाव असलेल्या बिनविषारी सापाला मराठीत सीतेची लट असे म्हणता येतील यांच्यात ही लढत झाली होती.मागील आठवड्यात शनिवारी (९ जून) रोजी त्यांनी कुटुंबिय व मित्रमंडळीसमवेत पेंच व्याघ्र प्रकल्पात जाण्याचा बेत आखला. ते स्वत: गाडी चालवीत होते. जात असताना सिल्लारी- खूर्सापार मार्गावर त्यांच्या गाडीसमोर अचानक एक गरुड खाली आला आणि त्याने जमिनीवरून जाणाऱ्या सापाला अलगद पकडून जवळच्या झाडावर नेले. तिथे जाऊन तो काही काळ स्तब्ध राहिला. छायाचित्रणाची जाण व आवड असलेल्या मराठे यांच्याजवळ अत्याधुनिक कॅमेरा होताच. त्यांनी क्षणभराचाही विलंब न लावता गाडी तात्काळ थांबवून ते दृष्य कॅमेराबद्ध केले. ज्या झाडावर गरुड होता त्याच्याजवळ अजिबात आवाज होऊ न देता अगदी हळूहळू त्यांनी गाडी चालवत नेली.काही वेळ गाडीतील सर्वजण स्तब्धता राखून त्या गरुडाच्या हालचाली निरखत राहिले. गरुडालाही जेव्हा आश्वस्त वाटले तेव्हा त्याने सापाला झाडावर मोकळे सोडले. सापानेही मोकळिक मिळताच आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यासाठी पवित्रा घेतला. गरुडाने चोचीने सापावर अनेक प्रहार केले. सापानेही गरुडाने तोंड उघडताच त्याच्या जिभेला दंश करून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस अर्धमेल्या झालेल्या सापाने शरणागती पत्करली आणि गरुडाने त्याला आपले भक्ष्य बनविले. त्यांच्यातील या लढतीतील प्रत्येक क्षणाला मराठे यांनी कॅमेराबद्ध केले आहे. ही अटीतटीची झुंज त्यांनी कॅनन ७ डी मार्क २ या कॅमेऱ्याने व १००-४०० एमएमच्या लेन्सने टिपली आहे. त्यांनी यापूर्वीही वन्यजीवांच्या अशा रोमहर्षक घडामोडींचे चित्रण केले आहे.