पॉवरलिफ्टिंग खेळाडू अल्फियाचा संघर्ष : स्ट्राँगेस्ट वूमनला मदतीची गरज निशांत वानखेडे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शक्ती आणि कौशल्य या दोन्हीचे समन्वय असलेला पॉवरलिफ्टिंग हा पुरुषांचे वर्चस्व असलेला खेळ. मात्र ही मक्तेदारी मोडित नागपूरच्या अल्फिया शेखने या खेळात अद््भूत कौशल्य प्राप्त करीत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाची चमकदार कामगिरी केली केली आहे. तिच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे येत्या आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी तिची निवड झाली आहे. हा तिच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेची तयारी करण्यापूर्वी तिला परिस्थितीशी लढावे लागत आहे. उत्कर्षनगर, काटोल रोड येथे राहणारी अल्फिया ही हारुन शरीफ शेख यांच्या चार मुलींपैकी एक. वडिलांचे जनरल स्टोअर्सचे दुकान आहे व त्यातूनच ते कुटुंबाचे पोषण करीत आहेत. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला असलेली अल्फिया शिक्षणासोबत जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करते. शरीरसौष्ठवाची तिची आवड बघून वडिलांनीच तिला पॉवरलिफ्टिंग खेळाकडे लक्ष देण्याची सूचना केली. तिनेही वडिलांच्या इच्छेला शिरोधार्ह मानले. सुरुवातीला एका स्थानिक कोचची मदत घेतली. मात्र त्यांचे मानधन परवडत नसल्याने त्याचे प्रशिक्षण सोडावे लागले. यावेळी वडिलांनी स्वत:च कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. कुणाचे पाठबळ नसताना अशाही स्थितीत अल्फियाने केवळ जिद्द, दृढ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर अल्पावधीतच या खेळात कुशलता प्राप्त केली. कौशल्याच्या बळावरच राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अल्फियाने एक-दोन नव्हे तर तब्बल २९ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. तिच्या या कामगिरीमुळे या खेळात तिला दोनदा ‘स्ट्राँगेस्ट टिन गर्ल आॅफ इंडिया’ आणि तीनदा ‘स्ट्राँगेस्ट वूमन आॅफ इंडिया’चा किताब देण्यात आला. येत्या २३ ते २७ आॅक्टोबरदरम्यान नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धा होणार आहे. एप्रिल महिन्यात या स्पर्धेची निवड प्रक्रिया पार पडली. गौरवाची बाब म्हणजे आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर अल्फियाने यामध्ये आपली निवड पक्की केली. ५७ किलो वजन गटात निवड झाली असल्याचे अल्फियाने सांगितले. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खरे तर चांगला कोच असणे आवश्यक आहे. मात्र कोचचा खर्च करणे त्यांना शक्य नाही. याशिवाय योग्य आहार आणि फिटनेस कायम राखणे हे तिच्या पुढे आव्हान आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशीपपूर्वी परिस्थितीशी लढा
By admin | Published: June 25, 2017 2:31 AM