नागपूर : तंत्रज्ञानामुळे जग आणखी जवळ आले असले तरी नातेसंबंधांमध्ये मात्र दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. घरातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नाही व एकाच इमारतीत राहून दहा दिशेला दहा तोंड असतात. लहानशा मुद्द्यावरून भावाभावांमध्येदेखील महाभारत घडल्याच्या घटना घडतात. अशीच घटना नागपुरात घडली. घराच्या दरवाजासमोर चप्पल ठेवण्याच्या लहानशा मुद्द्यावरून दोन सख्ख्या भावामध्ये झालेल्या वादाचे तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले. इतकेच काय तर या भांडणात लहान भावाने मोठ्या भावाच्या घरातील टीव्ही पहिल्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना हंसापुरी येथे घडली. आश्चर्याची बाब म्हणजे घरी आई-वडील असताना हा प्रकार घडला.
हंसापुरी येथील धोंडबा चौकाजवळ रूपेश राजेंद्र उमरे (३६) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे घर वडिलोपार्जित असून दुसऱ्या माळ्यावर त्यांचा सख्खा भाऊ नीरज उमरे (३२) हा आई-वडिलांसह राहतो. त्यांच्या कंपाउंडच्या प्रवेशद्वाराजवळच चपलांचे स्टँड असून दोन्ही भावांचे कुटुंबीय तेथेच चपला ठेवतात. रविवारी दुपारी नीरज बाहेरून आला व त्याने पहिल्या माळ्यावर रूपेशच्या दरवाजासमोर चप्पल काढली. यावरून रूपेशने हटकले असता नीरजने ‘मी इथेच चप्पल काढणार, जे करायचे ते करून घ्या’ असे उत्तर दिले. त्यामुळे रूपेशची पत्नी संतापली व नवरा-बायकोचा लहान भावाशी वाद झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला व संतापलेल्या नीरजने मोठा भाऊ व वहिनीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याने मोठ्या भावाच्या घरातील टीव्ही पहिल्या माळ्यावरून खाली फेकला. इतकेच नाही तर त्याने घरातून देवघर आणले व ते वहिनीला मारण्याचा प्रयत्न केला. तो वार रूपेशच्या हातावर बसला व गंभीर जखम झाली. रूपेशने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी लहान भावाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.