लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका निवृत्त अधिकाऱ्याने त्याच्या शेजाऱ्यावर पिस्तूल ताणले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. सय्यद युनूस परवेज (वय ६२) असे पिस्तूल ताणणाऱ्याचे नाव आहे. ते जाफरनगर चाैकाजवळ राहतात. पीडब्ल्यूडीचे निवृत्त अभियंता असलेल्या सय्यद यांचा मुलगा मुंबईत एका नामांकित इस्पितळात डॉक्टर म्हणून सेवारत आहे. नुकताच तो नागपुरात आला. त्यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये बदामाचे झाड आहे. त्याचा कचरा नेहमी सय्यद यांच्या बंगल्याच्या आवारात पडतो. त्यामुळे नेहमी कुरबुरीही होतात. रविवारी सय्यद यांनी झाडाच्या काही फांद्या छाटून घेतल्या. आपल्या बंगल्यातील कचरा मजुरांच्या हाताने फेकला. मात्र, अपार्टमेंटमध्ये कचरा तसाच पडून राहिला. त्यावरून तेथे राहणाऱ्या युसूफ जमिर शेखसोबत त्यांचा जोरदार वाद झाला. रात्री सिजानला हे समजल्यानंतर त्याने युसूफला जाब विचारला. त्यामुळे धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे सय्यद मुलाच्या मदतीला धावले. त्यांच्याकडे परवाना असलेली पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तुलाचा धाक युसूफला दाखवला. माझ्या मुलाला हात लावल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. पिस्तूल पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून कसाबसा वाद मिटवला. मात्र, नंतर दोन्हीकडची मंडळी गिट्टीखदान पोलिसांकडे पोहोचली. त्यांनी परस्परांविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी सय्यद आणि युसूफच्या तक्रारीवरून त्या दोघांवरही गुन्हा दाखल केला.
----
प्रकरणाबाबत पोलीसच अंधारात
या प्रकरणाबाबत गिट्टीखदान ठाण्यातील अनेक पोलीस अंधारात असल्याचे जाणवले. माहिती विचारली असता असे काही घडले याची आमच्याकडे माहिती नसल्याचे काहींनी सांगितले. त्यांना या प्रकरणाची खरेच माहिती नव्हती, की ती त्यांनी जाणीवपूर्वक दडवली, ते कळायला मार्ग नाही.
----
----