नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे व्यथित झालेल्या वारकरी संप्रदायातील काही वारकऱ्यांनी रामगिरी या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सुषमा अंधारे यांनी संतांचा, तसेच देवतांचा अपमान केल्याची या वारकऱ्यांची तक्रार आहे. ही कैफियत मांडण्यासाठी विश्व वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या पुढाकारात दोन दिवसांपूर्वी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हिंदू देवदेवतांवर केलेली वक्तव्य खपवून घेऊ नयेत, अशीही अपेक्षा निवेदन देऊन व्यक्त केली. याच विवशी विधानभवनात जाऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याचा आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनी केला. मात्र, भेट न होऊ शकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन दिल्याचे अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.