नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने एका विवाहित महिलेची तक्रार मंजूर करून पाच आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला व इतर संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याचा आणि प्रकरणाचा तपास करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश अजनी पोलिसांना दिला. तक्रारीवर न्या. ए. ए. बदर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
आरोपींमध्ये निखिल पुरुषोत्तम भजन, पुरुषोत्तम भजन, विद्या पुरुषोत्तम भजन, स्नेहा नीलेश महंत व पद्मा रामचंद्र हिंगे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध मयुरी संजय केसारे यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपींनी लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले असा केसारे यांचा आरोप आहे. त्यांनी तक्रारीसोबत वैद्यकीय अहवाल व जखमी अवस्थेतील छायाचित्रे न्यायालयात सादर केली होती. त्यावरून तक्रारीमध्ये प्रथमदृष्ट्या तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने सदर आदेश दिला. केसारे यांनी सुरुवातीला २२ मे २०२१ रोजी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला नाही. करिता, केसारे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. केसारेतर्फे ॲड. नीतेश समुंद्रे यांनी कामकाज पाहिले.