लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व शिक्षक मो. अशफाक अली यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०६, २९४, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचा आदेश लकडगंज पोलीस निरीक्षकांना दिला. तसेच, प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.
प्रकरणावर न्या. व्ही.एम. देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चौधरी व अली यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक राजा जमशेद शरीफ यांनी अर्ज दाखल केला होता. शरीफ यांनी अली यांना घर बांधण्यासाठी वेळोवेळी एकूण १४ लाख ६ हजार रुपये दिले होते. तसेच, त्याविषयी करार केला होता. परंतु, अली यांनी निर्धारित वेळेत ही रक्कम परत केली नाही. उलट चौधरी यांच्या मदतीने शरीफ यांना दाबण्याचा प्रयत्न केला. १२ मार्च २०२० रोजी चौधरी यांनी शरीफ यांना गुन्हे शाखा कार्यालयात बोलावून मारहाण व शिवीगाळ केली. अली यांच्याकडून पैसे घेणे नसल्याचे बळजबरीने लिहून मागितले. तसेच, शरीफ यांची सोन्याची चेन व ब्रासलेट हिसकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अर्जात करण्यात आला होता. त्यामध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आल्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला.