लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन न झाल्यामुळे अनेक विकास कामांच्या फाईल्सवर निर्णय होताना दिसत नाही. नागपूरमेट्रो रेल्वेचा दुसरा टप्पा मंजूर होऊन १० महिन्यांचा कालावधी लोटला असून, राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडून (यूडीसी) सुधारित डीपीआर केंद्र सरकारकडे अजूनही पोहोचला नाही. त्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंता असून, दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी जेवढा उशीर होईल, तेवढा प्रकल्पाचा खर्च वाढेल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात फाईल मंजूर होण्यास जास्त कालवधी लागत नव्हता, हे विशेष.दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाने यावर्षी ८ जानेवारीला मंजुरी दिली होती. एप्रिलमध्ये डीपीआर तयार करून राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या हाऊसिंग व अर्बन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. मंत्रालयाने डीपीआरच्या तपासणीनंतर त्यात काही त्रुटी काढून सुधारणा आणि प्रकल्पाचा खर्च कमी करण्यास सांगितले होते. त्यानंतर डीपीआर राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. डीपीआर पुन्हा मेट्रोकडे परत आला. त्यातील त्रुटी आणि प्रकल्पाच्या खर्चात कपात करून परत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. तेव्हापासून फाईल तिथेच पडून आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून फाईल राज्याच्या नागरी विकास मंत्रालयाकडे आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री व्यस्त होते. लोकसभा निवडणुकीनंतर महाजनादेश यात्रेमुळे त्यांना वेळ मिळाला नाही. या कारणामुळे त्यांना लक्ष देता आले नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते व्यस्त राहिले. आता महाविकास आघाडीचे सरकार ही फाईल केंद्राकडे मंजुरीसाठी लवकरच पाठवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.४८ किमीच्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन४८ किमीच्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन असून, सर्व बांधकाम एलिव्हेटेड राहणार आहे. उड्डाणपूल असलेल्या मार्गावर डबलडेकर पूल बनविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १०,८६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा मिहान ते बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा कॉलनीपर्यंत १९ किमीचा टप्पा असून या मार्गावर जामठा परिसर, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनी स्टेशनचा समावेश आहे. तसेच पारडी ते ट्रान्सपोर्टनगर या चार किमीच्या मार्गावर तीन स्टेशन आणि अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर, आसोली हा भाग आणि ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान या १३ किमीच्या मार्गावर १३ स्टेशन आणि खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस हा भाग तसेच वासुदेवनगर ते वाडी या सहा किमी लांबीच्या मार्गावर दोन स्टेशन आणि रायसोनी कॉलेज परिसर, एमआयडीसी क्षेत्र, ऑर्डिनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडी, अमरावती रोड तसेच हिंगणा माऊंट व्ह्यू ते हिंगणा तहसील या सहा किमी मार्गावर पाच स्टेशन असून नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा गाव, एमआयडीसी या भागांचा समावेश आहे.