लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवू पाहणाऱ्या ढवळे बंधू आणि त्यांच्या नातेवाइकांसह २२ आरोपींवर अखेर अजनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रकाश माणिकराव ढवळे आणि त्यांचे १६ नातेवाईक तसेच मनोहर गोविंद भट, दिनेश गजभिये, विद्यासागर विनायक कठाळपवार, राजा दत्तात्रय आकरे आणि चंद्रकांत विश्वास (सर्व रा. बाबुळखेडा, अजनी) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
माैजा बाबुळखेडा शेत सर्व्हे क्रमांक ८२-१ पहन ३९ ही जमीन ॲड. माणिकराव जागोराव सहारे आणि मानव सेवा सोसायटीच्या मालकीची होती. त्यांनी त्यातील १०.३० एकर जमीन १९८२ मध्ये विकली. जमीन पडीत अवस्थेत असल्याचे पाहून १० जानेवारी १९९० ते १९९८ या कालावधीत आरोपी ढवळे बंधू, त्यांची बहीण आणि इतर नातेवाईक तसेच उपरोक्त आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर बनावट कागदपत्राच्या आधारे ही जमीन गांधीनगर को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, ओम कस्ट्रक्शन कंपनी, लहरीकृपा गृहनिर्माण सोसायटी आणि अमरतृप्ती को ऑपरेटिव्ह सोसायटी यांना विकली. त्यामुळे या जमिनीच्या वादाची अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांकडून कारवाईची ठोस पावले उचलली गेली नाही. त्यामुळे वाद न्यायालयात गेला. तब्बल २२ वर्षानंतर या प्रकरणात बुधवारी अजनी पोलिसांनी आरोपी ढवळे बंधू, त्यांचे नातेवाईक आणि साथीदारांसह २२ आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
संबंधितांमध्ये खळबळ
विशेष म्हणजे, उपरोक्त आरोपींकडून प्लॉटच्या स्वरूपात त्यावेळी लाखो रुपये देऊन ही जमीन अनेकांनी विकत घेतली. त्यावर वॉलकंपाउंडही घातले. पोलिसांनी आता आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने त्यांच्याकडून जमीन विकत घेणा-यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.