नागपूर : कळमना पोलिसांनी अखेर वांजराच्या समालोचन सोसायटीच्या ले आउटच्या भूखंडावर ताबा व सार्वजनिक वापराची जागा गरीब परिवारांना विकून फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये सोसायटीचे अध्यक्ष मेहबूब खान, सचिव अहमद इस्माईल खान ऊर्फ बाबा भाई, रवी ऊर्फ अण्णा डिकोंडवार आणि सुनील फर्निचरवाले यांचा समावेश आहे. आरोपींवर सोसायटीच्या भूखंडावर ताबा मिळवून गरिबांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. फिर्यादी सीमा चंद्रिकापुरे (४६) यांच्या तक्रारीनुसार जुलै २०१५ मध्ये बाबा आणि रवीने त्यांना मौजा वांजरा खसरा नं. १०९, १०९/१ व १०९/२ येथील रिकाम्या जमिनीवर प्लॉट नं. ४४३ ए (६०० चौ. फूट) दाखवून दोन लाखांत विक्री केली होती. त्यांनी संबंधित प्लॉटवर दीड लाख रुपये खर्च करून लहान घर बांधले होते. परंतु, २०२० मध्ये नासुप्रच्या एक महिला अधिकारी व कर्मचारी सोसायटीत आले. त्यांनी ही जमीन सोसायटीच्या सार्वजनिक वापराची असल्याची माहिती दिली. त्यानंतरही रवी आणि बाबा जमीन क्लीअर करून देतो, अशी बतावणी करीत होते. काही दिवसांपूर्वी चंद्रिकापुरे यांच्या मुलाला तलवार दाखवून सुनील फर्निचरवाले याने पोलिसात तक्रार दिल्यास किंवा प्रसारमाध्यमांना माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी कळमना ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
...........
तक्रारीनंतरही दखल नाही
समालोचन सोसायटीचे अनेक भूखंडधारक फसवणूक झाल्यानंतर कळमना ठाण्यात चकरा मारीत आहेत. तक्रारकर्त्यांनुसार कळमना ठाण्याचे तपास अधिकारी सावंत तपास सुरू असल्याचे सांगून त्यांना परत पाठवत होते. त्यामुळे काही तक्रारकर्ते गुन्हे शाखेत पोहोचल्यानंतर डागा नावाच्या अधिकाऱ्याने त्यांना परत पाठविल्याचा आरोपही ते करीत आहेत.
आरोपी झाले फरार
कळमना पोलिसांनी अखेर १९ जुलै रोजी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, आतापर्यंत तक्रारकर्त्यांना एफआयआरची कॉपी देण्यात आली नाही. गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले, तरी पोलीस माहिती कक्षालाही फसवणुकीच्या प्रकरणाची माहिती देण्यात आली नाही. या दरम्यान आरोपी फरार होऊन जमानतीसाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
............