नागपूर : रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्याच्या प्लॉटवर कब्जा घेणाऱ्या भूमाफियाविरोधात वाठोडा पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ पाटील (शक्तिमाता नगर) आणि अरबाज खान (हसनबाग) यांनी ६ फेब्रुवारीच्या सकाळी आपल्या साथीदारांच्या मदतीने अध्यापक नगरात राहणारे रेल्वेतील सेवानिवृत्त अभियंता मनोहर खापेकर यांच्या वाठोडातील ऑरेंज नगरातील प्लॉटवर अवैधपणे कब्जा केला होता. वाठोडा पोलिसांनी खापेकर यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या दरम्यान सेमिनरी हिल्स येथील दिलीप जोशी यांनीदेखील एकनाथ पाटील आणि अरबाज खान यांच्याविरोधात त्यांचाही प्लॉट बळकावल्याची तक्रार पोलिसात केली होती. या घटनेत तर त्यांनी जेसीबीने जोशी यांच्या प्लॉटवरील खोलीचे बांधकाम तोडले होते. शिवीगाळ करून जीवानिशी मारण्याची धमकीही दिली होती. जोशी यांच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात दंगल करण्याची आणि अवैधपणे बळजबरीने प्लॉट बळकावल्याचा गुन्हा दाखल केला.
या दोन्ही घटनांमुळे परिसरात तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाठोडा पोलीस स्टेशन तसेही जमिनीच्या वादविदाबाबत नेहमी चर्चेत असते. बनावट कागदपत्रे तयार करून भूमाफिया प्लॉट बळकावतात. कुख्यात बग्गाचे प्रकरणही यातूनच पुढे आले आहे. पोलिसांना गुंगारा देऊन तो आजही बिनदिक्कत खुलेआम फिरत आहे. त्याला अटक करता न आल्याने पोलिसांनी प्रतिमा मलिन होत आहे. एकनाथ पाटील आणि अरबाज खान कुख्यात गुंड असल्याचे सांगितले जाते. भरदिवसा जेसीबी लावून प्लॉटवरील बांधकाम तोडले, यावरून त्याच्या दहशतीची कल्पना येते.