नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कुख्यात रंजीत सफेलकरने केलेला विशाल पैसाडेली या मित्राचा खून एक अपघात असल्याचे सांगल्याच्या प्रकरणात खून आणि गुन्हेगारी षडयंत्र या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावनेर न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या प्रकरणात रंजीत आणि कालु हाटेसह ६ आरोपींचा समावेश आहे. विशालच्या खूनाच्या १४ वर्षानंतर ही कारवाई झाली आहे.
कामठी येथील रहिवासी विशाल पैसाडेली (३२) ची रंजीत आणि कालुशी मैत्री होती. रंजीतला विशालचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. त्यामुळे त्याने २३ मार्च २००७ रोजी कालूच्या माध्यमातून विशालला आपल्या घरी बोलावले. तेथे मारहाण करून दारु पाजल्यानंतर कामठी छावणीच्या वारेगाव पुलावर स्कूटरजवळ झोपवून त्याला स्कॉर्पिओने चिरडले. त्यानंतर मृतदेहाला १० फूट खोल जागेत फेकून दिले. या प्रकरणात खापरखेडामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करून त्यात बनावट व्यक्तीला आरोपी वाहनचालक म्हणून सादर करून सत्यस्थिती लपविण्यात आली. मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हेशाखेला खरी माहिती समजली. क्राईमच्या युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक ओम सोनटक्के यांच्या पथकाने याचा तपास करून १४ वर्षानंतर सत्य बाहेर काढले. यात सफेलकर टोळीने योजनाबद्ध पद्धतीने हा खून घडविल्याचा खुलासा झाला. हा तपास अहवाल ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना पाठविण्यात आला. खापरखेडाचे निरीक्षक भटकर यांनी सावनेर न्यायालयात हा अहवाल सादर केला. त्या आधारे न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी दिली. त्या आधारावर सफेलकर टोळीविरुद्ध खून, गुन्हेगारी षडयंत्र आदी कलमानुसार आरोपपत्र सादर करून खटला चालविण्यात येणार आहे. सध्या सफेलकर टोळी तुरुंगात आहे.
............