नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. शुक्र वारी पूर्व नागपुरातील दोन बोगस डॉक्टरांच्या विरोधात कळमना पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. बोगस डॉक्टरात सुभाषनगर येथील सज्जन अग्रवाल व विजयनगर येथील लंकेश कनौजे यांचा समावेश आहे. पारडी भागात दोन बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकाने अग्रवाल याचेवर पाळत ठेवली होती. अग्रवाल हा सूर्यनगर येथील रहिवासी असून सुभाषनगर येथे त्याचा दवाखाना असल्याचे निदर्शनास आले. बोगसपणा निदर्शनास येऊ नये म्हणून त्याने दवाखान्यापुढे कोणताही फलक लावलेला नव्हता. चौकशीदरम्यान त्याच्या दवाखान्यात आयुर्वेदिक व अॅलोपॅथी औषधे आढळून आली. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाबाबतचे प्रमाणपत्र नाही. त्याचेकडे आग्रा येथील आयुर्वेदिक विश्वविद्यालयाचे प्रमाणपत्र आढळून आले. कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना लंकेश कनौजे रुग्णांना आयुर्वेदिक व अॅलोपॅथी औषधी देत होता. दोघांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३४ अन्वये कारवाई करण्यात आली. मनपाचे अपर आयुक्त हेमंत पवार व आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या निर्देशानुसार डॉ. सुनील घुरडे व डॉ. विजय जोशी यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)
दोन बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल
By admin | Published: July 26, 2014 3:02 AM