लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भालदारपुरा येथून पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयचा एक एजंट आणि एका पाकिस्तानी नागरिकास पकडल्याचा दावा करणाऱ्या कथित मेजर पंकजविरुद्ध बुधवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वत:ला मिलिट्री इंटेलिजन्सचा अधिकारी असल्याचे सांगितले होते.पोलीस सूत्रानुसार गणेशपेठ पोलीस ठाण्यात फोन करणारी व्यक्ती पंकज आहे. तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे राहणारा आहे. यावेळी तो सैन्याच्या पुरवठा कोरमध्ये (शिपाई) सैनिक आहे. त्याचा विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४१९ व ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानुसार हिमाचल प्रदेशात सैन्याच्या गुप्तचर एजन्सीच्या एका टीमने मंगळवारी पंकजला विचारपूस करण्याासाठी ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्याने फोन केला नसल्याचे सांगितले आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यानुसार या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पंकजला सोपविण्याबाबत सैन्याच्या गुप्तचर संस्थेला विनंती करेल.गेल्या ८ नोव्हेंबर रोजी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने फोन केला होता. त्याने स्वत:ला सैन्याच्या गुप्तचर एजन्सीच्या मुंबई शाखेचा मेजर असल्याचे सांगितले होते. सोबतच दावा केला होता की, त्याने एक आयएसआय एजंट व पाकिस्तानी नागरिकास पकडले आहे. याची माहिती मिळताच शहर पोलिसात खळबळ उडाली. प्रकरण उघडकीस आल्यावर सैन्याच्या गुप्तचर एजन्सीने शहरात अशा कुठल्याही प्रकारचे अभियान राबविण्यात आले नसल्याचा दावा केला होता. सोबतच असेही सांगितले होते की, ज्या फोनवरून गणेशपेठ ठाण्यात फोन करण्यात आला होता तो हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील सैन्याच्या पुरवठा विभागाच्या कोरमध्ये तैनात असलेल्या पंकज येरगुडा नावाने रजिस्टर असल्याचेही सांगितले होते.