वरोरा : तालुक्यातील बांद्रा या गावात शासकीय कामाकरिता गेलेल्या एका तलाठ्यास गावातील एका इसमाने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वरोरा तालुक्यातील बांद्रा येथे मंडल अधिकारी यांच्या समवेत तलाठी खुशाल तुराळे पीक कापणी प्रयोग राबविण्याकरिता गावातील नागरिकांना आवाज देत असताना बांद्रा गावातील चंपत तिमाजी हक्के इसमाने तलाठी खुशाल तुराळे यांच्याशी वाद घातला व तलाठ्याला मारहाण केली. याबाबत शेगाव पोलीसात तलाठी खुशाल तुराळे यांनी तक्रार नोंदविली असून या तक्रारीवरुन शेगाव पोलिसांनी चंपत हक्के यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३२३, २९४, ५०४, ५०६ भादंविने गुन्हा नोंदविला. तलाठी संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तलाठी खुशाल तुराळे यांना कर्तव्य बजावीत असताना एका इसमाने मारहाण केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अटक करण्यात आली नाही. त्याला अटक झाली नाही तर तलाठी संघटना २५ सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तलाठ्यास मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: September 24, 2015 1:16 AM