नागपूर : सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीकरणासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी योजनेच्या अटीनुसार https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच पात्र विद्यार्थी व महाविद्यालयांनी अर्ज नोंदणी करावी. नोंदणीकरण विशिष्ट कालावधीसाठी असल्याने त्याला प्राधान्य देण्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळवले आहे.
---------------
निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याची थकबाकी मार्च महिन्यात
नागपूर : निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याची थकबाकी मार्च महिन्याच्या निवृत्तीवेतनासोबत देण्यात येईल. शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०१९ ते ३० जुन २०१९ या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम माहे जानेवारीच्या निवृत्तीवेतनासोबत द्यावयाची आहे.
पण आर्थिक वर्ष २०२०-२१ आयकरपात्र निवृत्तीवेतन धारकांच्या आयकराची परिगणना करून पुढील दोन महिन्यात कपात करावयाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोषागाराकडे आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांची संख्या जास्त आहे. त्यांच्या थकबाकी रकमेसह सर्व विवरणे नव्याने तयार करुन देणे विहीत वेळेत शक्य नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याची थकबाकी मार्च महिन्याच्या निवृत्तीवेतनासोबत प्रदान करण्यात येईल. यांची सर्व निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
-------------------
माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ पर्यावरणाची शपथ
नागपूर : माझी वसुंधरा या अभियानांतर्गत स्वच्छ पर्यावरणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. बचत भवन येथे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आ. ना. गो. गाणार, आ. प्रवीण दटके, आ. अभिजीत वंजारी, आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. आशिष जैस्वाल, आ. विकास कुंभारे, आ. टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त शीतल तेली - उगले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.