लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत आठवडी बाजारांवर बंदी घातली असून, तसेच आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. मात्र, बुटीबाेरी येथे शुक्रवारी (दि. २६) नेहमीप्रमाणे आठवडी बाजार भरला हाेता. या बाजारात भाजीपाल्यासह इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली हाेती.
बुटीबाेरी येथे दर शुक्रवारी माेठा आठवडी बाजार भरताे. या बाजारात स्थानिक व परिसरातील गावांमध्ये राहणारे नागरिक, शेतकरी, कर्मचारी, कामगारांह इतर खरेदी करण्यासाठी माेठ्या संख्येने येतात. दरम्यान, काेराेना संक्रमणात वाढ हाेत असल्याने जिल्हा प्रशासनाने २५ फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात आठवडी बाजारावर बंदी घातली. तसेच आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. त्याअनुषंगाने प्रशासनाने शहरात दवंडी देऊन नागरिकांना आठवडी बाजार भरणार नसल्याची सूचनाही दिली.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी आठवडी बाजारात विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर स्थानिक व परिसरातील गावांमधील नागरिक खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झाले. या बाजारातील बहुतांश नागरिक विना मास्क हाेते तर कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. ही बाब प्रशासनाला माहिती हाेती. मात्र, कुणीही कारवाई करण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे बाजारातील नागरिकांचा हा निष्काळजीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडू शकताे, अशी शक्यताही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.