नागपूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सुरू असलेले गलिच्छ राजकारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचेच असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, या राजकारणात विदर्भाचा बळी पडेल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
साहित्य, नाटक वा अन्य कोणतेही कलाक्षेत्र असो... शासकीय, निमशासकीय वा शासन अनुदानित संघटनांकडून विदर्भाकडे कायम दुय्यम नजरेनेच बघितले गेले आहे. जो कोणी विदर्भाच्या बाजूने भक्कम उभा झाला, त्याचे लचके तोडण्याचे काम या संघटनांच्या मध्यवर्ती कार्यकारिणीकडून होते, याची अनुभूतीही अनेकांनी वेळोवेळी घेतली आहे. नेमके तेच धोरण चित्रपट महामंडळातही सुरू असल्याचे दिसून येते. महामंडळाच्या विदर्भ कार्यकारिणीच्या मतांवरून तरी हे लक्षात येत आहे.
विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातच चित्रपटाला अनुकूल वातावरण आहे, अशा गैरसमजातून चित्रपट महामंडळाने इकडे कधीच लक्ष पुरवले नाही. अधामधात अध्यांची वारी विदर्भात होत असे. मात्र, ते केवळ टेहळणीचे राजकारण होते, हेही अनेकदा लक्षात आले आहे. मात्र, साडेचार वर्षापूर्वी विदर्भाला शाखा आणि कार्यालयही मिळाले आणि चित्रपट निर्मितीबाबतच्या अनेक कामकाजाचे वैदर्भीयांचे ओझे कमी झाले. हे सगळे ज्यांच्या प्रयत्नाने झाले त्यांचीच उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे, हे राजकारण विदर्भाला प्रतिकूल तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
----------------
कोट्स...
यापूर्वी कुणीच विदर्भाचा विचार केला नव्हता. मेघराज राजेभोसले यांनी केला. मग, त्यांची साथ कशी सोडणार. पुढे काय होते, ते बघू. मात्र, विदर्भ या गलिच्छ राजकारणात आणि आगामी निवडणुकीत राजेभोसले यांच्या पाठीशी राहणार.
- राज कुबेर, मुख्य समन्वयक : अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ (विदर्भ)
ज्या अध्यक्षाला पदच्युत करायचे, त्याला माहीत न करता हे राजकारण करणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. चार महिन्यात निवडणूक आहे. त्याचाच हा परिणाम. या राजकारणाचा परिणाम विदर्भावर होऊ देणार नाही.
- रूपाली मोरे, समन्वयक : अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ (विदर्भ)
............