निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे मायानगरीचे बॉलिवूड, हवेहवेसे वाटणाऱ्या या झगमगाटाचे सर्वांना आकर्षण आहे. दुसरीकडे शेतीचे असे जग, ज्याच्या वाईट अवस्थेमुळे कुणीही तिकडे जाण्यास तयार नाही. सिनेमात शेती येत असली तरी या दोन जगांचा तसा संबंध येत नाही. पण एखादी व्यक्ती चंदेरी झगमगाटाची यशस्वी कारकीर्द सोडून राबण्यासाठी काळ्या मातीत येत असेल तर.? फिल्मफेअर पुरस्कार विजेता, प्रख्यात कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हे त्या मनस्वी अवलियाचे नाव आहे. अर्थातच या प्रवासामागे निष्ठूर आघातांची हृदय हेलावणारी कहाणी दडलेली आहे.‘सागर’ या सुपरहिट चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या लीलाधर सावंतांचा पुढचा प्रवास स्वप्नवत असाच होता. मोठ्यातला मोठा चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता त्यांच्याकडून चित्रपटाचे सेट्स बनवून घेण्यास तयार होता. शहंशाह, क्रांतिवीर, हत्या, सलाखे, अनाडी, मै खिलाडी तू अनाडी, १०० डेज अशा एकेक करीत तब्बल १७७ हिंदी चित्रपटांचे आणि चार हॉलिवूडच्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन या अवलियाने केले. बॉलिवूडच्या ३७ वर्षांच्या प्रवासात त्यांनी सर्वकाही प्राप्त केले होते आणि अचानक नियतीने एक मोठा आघात त्यांच्यावर केला. त्यांचाच वारसा घेऊन कलेच्या क्षेत्रात सुरुवात करू पाहणारा त्यांचा मुलगा विशाल १४ वर्षांपूर्वी कॅन्सरने हे जग सोडून गेला. या आघाताने प्रचंड निराश झालेले सावंत मायानगरीतील सर्वकाही सोडून वाशिम जिल्ह्यातील जऊळका या गावाकडे परतले आणि वडिलोपार्जित शेती करू लागले.काही कामानिमित्त नागपूरला मुक्कामाला असलेल्या लीलाधर सावंत यांनी लोकमतशी संवाद साधला. प्रेमविवाह केल्यानंतर घरचा विरोध पत्करून ते सैन्यदलात भरती झाले. पाच वर्ष सेवेनंतर परतले तर वडिलांनी घराबाहेर काढले. त्यामुळे ते मुंबईला गेले. काम मिळविताना त्यांनी सुरुवातीला एका कला दिग्दर्शकाकडे सहायक म्हणून काम केले. पण संधी मिळाली तेव्हा स्वत:चे कौशल्यही सिद्ध केले व यशस्वीही झाले.एवढ सर्व प्राप्त करूनही मुलाच्या मृत्यूने पुरते खचलेल्या लीलाधर यांना ही चंदेरी दुनिया नकोशी झाली होती.गावी आल्यावर ते अलिप्त राहून शेती करायला लागले होते. बॉलिवूडच्या झगमगाटाचा काडीचाही संबंध राहिला नव्हता. मित्रांना मात्र त्यांच्यातील कला मरू द्यायची नव्हती. त्यांनी गणपती व दुर्गा मंडळाच्या सेट्स उभारणीसाठी सावंत यांनी प्रेरित केले. आर्थिक फसगत व निराशेमुळे अधिक मानसिक धक्का बसत गेला व सात महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज व पॅरालिसिसचा आघात बसला.
नवी उमेद कायमकदाचित कुटुंबाच्या सोबतीमुळे व मित्रांच्या सहकार्यामुळे ते पुन्हा नव्याने उभे राहिले आहेत. मात्र पूर्वीसारखी चपळता आता राहिली नाही. शब्द अडखळतात व स्मृतीही साथ सोडते. मात्र त्यांच्यातील नवी उमेद कायम आहे. ते पुन्हा कलेला समर्पित होऊ पाहत आहेत.