नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण ३१ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार १८ आक्षेप नोंदविण्यात आले होते. मात्र, निवडणूक आयोगाने सर्व आक्षेप फेटाळल्याने सोडतीनुसार जाहीर करण्यात आलेले आरक्षण कायम राहणार आहे.
सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या अंतिम प्रारूपाला १२ मे रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर ३१ मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यावर १ जून ते ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार १८ आक्षेप आले होते. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४,४७,४९४ एवढी असून यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,८०,७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,८८,४४४ एवढी आहे. नागपूर शहराची ५२ प्रभागांमध्ये विभागणी करून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे.
असे होते आक्षेप
- प्रभाग ४ मध्ये अनुसूचित जाती महिलाऐवजी अनुसूचित जाती पुरुषासाठी राखीव करण्याची मागणी केली होती. हा आक्षेप फेटाळण्यात आला.
- विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव नाही. मग मनपा निवडणुकीतच का? असा प्रश्न आक्षेपातून उपस्थित करण्यात आला. तर काही प्रभागात आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गासाठी जागा ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. हे आक्षेपही फेटाळण्यात आले.
- एकूण प्रभाग -५२
- एकूण सदस्यसंख्या -१५६
- महिलांसाठी राखीव-७८
- अनुसूचित जातीच्या ३१ पैकी १६ जागा महिलांसाठी राखीव
- अनुसूचित जमातीच्या १२ पैकी ६ जागा महिलांसाठी राखीव
- सर्वसाधारण प्रवर्गाच्या ११३ पैकी ५६ जागा महिलांसाठी राखीव