लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब करण्यात आला असा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केला. त्यावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला न्यायालयाने बुधवारी अंतिम संधी म्हणून ११ जूनपर्यंत वेळ वाढवून दिला.गेल्या तारखेला न्यायालयाने मंडळाला उत्तर सादर करण्यासाठी बुधवारपर्यंतच वेळ दिला होता. परंतु, मंडळाला या वेळेत उत्तर सादर करता आले नाही. त्यामुळे मंडळाने ११ जूनपर्यंत वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता अंतिम संधी म्हणून मंडळाची विनंती मान्य केली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात वैष्णवी मणियार या विद्यार्थिनीने रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेतील माहितीनुसार, ‘नीट’ परीक्षा तीन तासांची होती. त्यासाठी सकाळी १० ते १ वाजताची वेळ देण्यात आली होती. याचिकाकर्तीचा रोल नंबर खोली क्र. ३९ मध्ये होता. तेथील विद्यार्थ्यांना सीलबंद लिफाफ्यामध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. दरम्यान, समवेक्षकाने पुढील सूचनेशिवाय लिफाफा उघडू नये, अशी सूचना केली. त्यामुळे कुणीच लिफाफा उघडला नाही. सकाळी १०.३० वाजता वरिष्ठ समवेक्षक आल्यानंतर त्यांनी ताबडतोब लिफाफा उघडून पेपर सोडवायला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावेळी विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी दुपारी १.३० वाजतापर्यंत वेळ मिळेल असे वाटले होते. परंतु, त्यांचे पेपर अगदी वेळेवर, म्हणजे, दुपारी १ वाजताच परत घेण्यात आले. याचिकाकर्तीतर्फे अॅड. मुग्धा व अॅड. रोहण चांदुरकर, आदर्श विद्यालयातर्फे अॅड. अनिल किलोर तर, सीबीएसईतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी.एस. कप्तान यांनी कामकाज पाहिले.