नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर संस्थेमार्फत २५ व २६ ऑक्टोबर रोजी एमपीएससी (राज्यसेवा) पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. परीक्षेकरिता एकूण ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र होते. यामध्ये १९ हजार १७३ उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. ‘महाज्योती’ने (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविलेले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या आक्षेप परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला पाठविण्यात आले व आवश्यक त्या सुधारणा करून अंतिम उत्तरपत्रिका तयार करण्यात आल्याची माहिती महाज्योती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
एमपीएससी (राज्यसेवा) प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ शिफ्टमध्ये या परीक्षा घेण्यात आल्याने गुणांचे सामान्यीकरण (नॉरमल्याझेशन) करण्यात आल्याचे परीक्षा एजन्सीने कळविलेले आहे. गुणांचे सामन्यीकरण करण्याकरिता परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डद्वारे वापरण्यात येणाऱ्या गुणांच्या नॉरमल्याझेशन सुत्रांचा वापर करण्यात आल्याचेही महाज्योतीद्वारे सांगण्यात आले आहे.
- सुधारित निकालासह प्रारूप निकाल प्रसिद्ध होणार
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा तज्ञांकडून करून घेण्याचे कार्य प्रगती पथावर आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या परीक्षेत किती गुण प्राप्त झाले व गुणांचे सामान्यीकरण केल्यानंतरच येणारे गुण प्राप्त होतात याची माहिती निकालाद्वारे देण्यात येणार आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत मनात कोणतीही शंका मनात बाळगू नये असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.