लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन या देशातच नव्हे तर जगात रक्तविहीन अशी ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. त्याचे स्मरण म्हणून या ठिकाणी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी बांधव नागपुरात येतात. बाबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतात. त्या धम्मदीक्षा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुस्तकांचे स्टॉल्स, धम्ममंच, डेकोरेशन, रोषणाईच्या कामाला वेग आला आहे.परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर ८ ऑक्टोबर रोजी ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणाऱ्या देश विदेशातील लाखो आंबेडकरी, बौद्ध अनुयायांच्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाजवळ केवळ चारच दिवस उरले आहे. दीक्षाभूमीवर महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसराची साफसफाई, आदी महत्त्वाची मूलभूत कामे केली जात आहे तर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमी परिसरातील रंगरंगोटी, पंचशील ध्वज, रोषणाई, धम्ममंच उभारला जात आहे. गुरुवारी याचा आढावा स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई व सचिव सदानंद फुलझेले यांच्यासह समितीच्या सदस्यांनी घेतला.दीक्षाभूमी परिसरात असणार ७०० स्टॉल्सस्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी सांगितले, दीक्षाभूमीच्या आत ३५० व बाहेरही तेवढेच स्टॉल लावले जाणार आहे. शनिवार ५ ऑक्टोबरला याचे वाटप केले जाईल. दीक्षाभूमीच्या आतील स्टॉल हे पुस्तके, बौद्ध साहित्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे तर बाहेर भोजनदान, मदत कक्ष व इतरांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.
रविवारपासून बौद्ध धम्मदीक्षाधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर बौद्ध दीक्षा-विधी सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा सोहळा रविवार ६ ऑक्टोबरपासून भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मुख्य उपस्थित होणार आहे. यासाठी डोम उभारण्यात आला आहे. गुरुवारी याच्या तयारीचा आढावा भदन्त ससाई यांनी घेतला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, या वर्षी बौद्ध धम्मदीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा तीन दिवस चालणार आहे.